सांगली : कर्ज आणि पत्नीच्या आजारपणाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वशी येथे घडली आहे. संजय चौगुले असे आत्महत्या करणाऱ्या 37 वर्षीय पतीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पत्नीच्या आजारपणासाठी भरपूर पैसा खर्च होत होता. यासाठी संजयला कर्ज घ्यावे लागले होते. हे कर्ज फेडणे संजयला अशक्य झाले होते.
संजय चौगुले यांच्या पत्नीचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली होती, ज्यामुळे त्यांच्या उपचारासाठी मोठा खर्च होता. यामुळे पत्नीच्या उपचारासाठी संजय यांनी कर्ज घेतले होते.
एवढा पैसा खर्च करुन उपचार करुनही पत्नीच्या प्रकृतीत सुधारण होत नव्हती. तसेच डोक्यावरचे कर्जही वाढत चालले होते. यानंतरही चौगुले यांच्या समस्या संपण्याचे नावच घेत नव्हत्या. काही दिवसांपूर्वी चौगुले यांच्या घरातील शेळ्या चोरीला गेल्या. संकटे थांबण्याचे नावच घेत नव्हते, त्यामुळे चौगुले सतत चिंतेत असायचे.
पत्नीही बरी नव्हती आणि डोक्यावर वाढत चाललेला कर्जाचा बोजा कसा फेडायचा या विवंचनेतून चौगुले यांनी राहत्या घराच्या शेजारी असलेल्या शेतातील शेडमध्ये गळफास घेत आत्महत्या केली.