नेट फ्लिक्सच्या वेब सिरीजमध्ये काम केलेला आयएएस अधिकारी सस्पेंड, या सरकारने उचलले पाऊल

| Updated on: Feb 09, 2023 | 9:06 AM

आयएएससाठी निवड होण्यापूर्वी अभिषेक सिंह आयपीएस अधिकारी म्हणून पोलीस अधिकारी होते. त्यांनी मुंबई पोलीस दलात डीसीपी म्हणून कामही केले आहे.

नेट फ्लिक्सच्या वेब सिरीजमध्ये काम केलेला आयएएस अधिकारी सस्पेंड, या सरकारने उचलले पाऊल
IAS ABHISHEK SINGH
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : नेट फ्लिक्सच्या ( Netflix )  ‘दिल्ली क्राईम सिझन – 2’  मध्ये अभिनय केलेल्या आयएएस  ( IAS ) ऑफीसर अभिषेक सिंह यांना अखेर आपली नोकरी गमवावी लागली आहे, त्यांनी गेल्या 82 दिवसांपासून सरकारला काही कळवता मोठ्या सुट्टीवर ते गेल्याने त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. अभिषेक सिंह यांच्या कुटुंबातील सर्वच सदस्य आयएएस किंवा आयपीएस आहेत. अभिषेक सिंह यांचे मुंबई कनेक्शनही आहे. त्यांनी यापूर्वी आयपीएस कॅडरमध्ये असताना मुंबईतही डीसीपी म्हणून काम केले आहे.

उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने गेले अनेक दिवस कामावर हजर न झालेल्या आणि मोठ्या रजेवर गेलेल्या आयएएस अधिकारी अभिषेक सिंह यांना सस्पेंड केले आहे. ते गेले 82 सलग रजेवर गेले होते. त्यामुळे कार्यालयीन बेशिस्त झाल्याचा आरोप ठेवत उत्तर प्रदेश सरकारने सरकारी सेवेतून त्यांना तडकाफडकी बडतर्फ केले आहे.

अभिषेक सिंह यांना यापूर्वी इलेक्शन कमिशनने सेवेतून काढले होते. गुजरात इलेक्शन कमिशनवर निरीक्षक म्हणून प्रतिनियुक्तीवर गेले होते. त्यावेळी त्यांनी ड्यूटीवर असताना आपल्या सरकारी गाडीसह स्वत:चा फोटो सोशल मिडीयावर शेअर केल्याने ते अडचणीत आले आणि त्यांना गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये इलेक्शन कमिशनने कमी केले. त्यानंतर ते पुन्हा उत्तर प्रदेशातील आपल्या मूळ नियुक्तीच्या ठिकाणी हजरच झाले नाहीत.

सोशल मिडीया स्टार 

अभिषेक सिंह हे सोशल मिडीया स्टार असून त्यांचे 30 लाख फोलोअर आहेत. त्यांनी अलिकडेच नेटफ्लिक्सवरील दिल्ली क्राईम सिझन – 2 मध्ये अभिनय देखील केला होता. तसेच प्रसिद्ध गायक ज्युबिन नटीयाल तसेच बी.प्रांक यांच्या सोबत म्युझिक अल्बमही काढला होता. लॅक्मे फॅशन विकमध्ये रॅम्प वॉक केल्याने ते प्रसिद्धीच्या शिखरावर गेले.

कोण आहेत अभिषेक सिंह

2011 सालच्या बॅचचे आयएएस असलेले अभिषेक हे युपी कॅडर आयएएस अधिकारी आहेत. बुधवारी युपी सरकारच्या नियुक्ती आणि कार्मिक विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दवेश चतुर्वेदी यांनी अभिषेक यांना सेवेतून बडतर्फ केल्याची ऑर्डर काढली. ग्लोबल इन्वेस्टर समिटमुळे युपी सरकारने 15 फेब्रुवारीपर्यंत सर्व आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या रजा रद्द केल्या आहेत.

हायप्रोफाईल घराणे

अभिषेक सिंह हे मोठ्या हायप्रोफाईल घराण्यातील आहेत. त्यांची पत्नी दुर्गा शक्ती नागपाल या साल 2009 च्या बॅचच्या युपी कॅडरच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांचे वडील कृपाशंकर सिंह युपी सरकारमधील आयपीएस अधिकारी आहेत. आयएएससाठी निवड होण्यापूर्वी अभिषेक आयपीएस अधिकारी म्हणून पोलीस अधिकारी होते. त्यांनी मुंबई पोलीस दलात डीसीपी म्हणून कामही केले आहे. साल 2014 मध्ये एका दलित शिक्षकाशी गैरवर्तवणूकीच्या आरोपामुळे निलंबित केले होते. गेल्या ऑक्टोबरमध्येही रजेवर गेल्याने त्यांच्यावर कारवाई झाली होती. 2015 साली ते दिल्लीमध्ये प्रतीनियुक्तीवर गेले होते. त्यानंतर त्यांनी साल 2018 पर्यंत आपली मुदत वाढवून घेतली होती.