कर्जत : नेहमीप्रमाणे दुकान बंद करुन घरी चाललेल्या ज्वेलर्स मालकाची धारदार शस्त्रांनी वार करुन हत्या केल्याची धक्कादाक घटना नेरळ-कशेळे राज्य मार्गावर घडली आहे. कर्जत तालुक्यातील मौजे कशेळे येथील ज्वेलर्स हरिश राजपूत यांची नेरळ-कशेळे राज्य मार्गावरील पूजा रिसॉर्टजवळ हत्या करण्यात आली आहे. अज्ञात आरोपींनी राजपूत यांच्या शरीरावर धारदार शस्त्राने 8 ठिकाणी वार करून खून करून आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले आहेत. याप्रकरणी नेरळ पोलीस आणि गुन्हे शाखा यांनी तपास सुरु केला आहे.
कर्जत तालुक्यातील कशळे येथील बाजारपेठेतील मुख्य नाक्यावर राजपूत यांचे राजेंद्र ज्वेलर्स नामक दुकान आहे. राजपूत हे शनिवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकान बंद करून आपल्या मोटारसायकलवरून कशेळे-नेरळ या राज्य मार्गावरून आपल्या डोंबिवली ठाकुर्ली येथील राहत्या घरी जाण्यासाठी निघाले होते.
हरिश राजपूत हे त्या रात्री घरी परतले नसल्याने त्यांच्या कुटुंबानी नेरळ पोलीस ठाण्यात रात्री फोन करून नेरळ पोलीस ठाणे गाठले. यावेळी नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर आणि त्यांच्या पथकाने राजपूत यांच्या येण्याच्या मार्गावर शोध घेतला.
यावेळी नेरळ-कशेळे राज्य मार्गावरील जिते ग्रामपंचायत हद्दीतील पूजा रिसॉर्ट जवळील परिसरात पोलिसांना रस्त्याच्या कडेला गवत वाकलेल्या अवस्थेत दिसून आले. तसेच या ठिकाणी राजपूत यांची मोटारसायकल ही मोडकळलेल्या अवस्थेत पडलेली दिसली.
हरिश राजपूत यांचा शोध घेतला असता ते खोल खड्ड्याच्या बाजूला मृत अवस्थेत पडलेले आढळून आले. यावेळी राजपूत यांच्या शरीरावर धारदार शस्त्राने आठ ठिकाणी वार केल्याचे दिसून आले. घटनेचे गांभीर्य ओळखून कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे हे घटनास्थळी हजर झाले.
तसेच स्थानिक पोलीस गुन्हे अन्वेषण शाखा LCB ची टीम, श्वान पथक तसेच कर्जत पोलीस ठाणे, खालापूर पोलीस ठाणे, रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीसही घटनास्थळी दाखल झाले.