नाशिक : नाशिक शहरात पोलीस आयुक्तपदी जयंत नाईकनवरे यांची नियुक्ती झाल्यानंतर शहरातील हेल्मेटसक्ती बंद करण्यात आली होती. तुरळक ठिकाणी हेल्मेट तपासणी केली जात होती. कारवाई देखील थंडावली होती. तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी मात्र याबाबत कठोर भूमिका घेत हेल्मेट सक्ती सुरू केली होती, नागरिकांनी सुरुवातीला विरोध केल्यानंतर तो मावळला होता. विविध उपक्रम यासाठी सुरू केले होते. हेल्मेटचा वापर करणाऱ्या दुचाकीचालकांना तब्बल दोन तासाचे समुपदेशन केले जात होते. त्यानंतर नो हेल्मेट नो एन्ट्री आणि नंतर नो हेल्मेट नो पेट्रोल असे उपक्रम राबवत नाशिक शहरात हेल्मेटसक्ती केली होती. नंतर आलेल्या पोलीस आयुक्तांनी हेल्मेट सक्तीकडे कानाडोळा केला होता. परंतु, पुन्हा एकदा आता नाशिक शहरात हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे. 1 डिसेंबर पासून नाशिक शहरात हेल्मेट सक्ती कठोरपणे राबविली जाणार आहे. हेल्मेटचा वापर न केल्यास कारवाईचा इशारा पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिला आहे.
थंडावलेली हेल्मेट सक्ती आता पुन्हा एकदा सुरू करणार असल्याचे शहराचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी सांगत कारवाईचा इशारा देखील दिला आहे.
नाशिक शहरात पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार 1 डिसेंबर पासून हेल्मेट सक्ती केली जाणार आहे. हेल्मेटचा वापर न करणाऱ्या चालकांवर दंडाची कारवाई केली जाणार आहे.
हेल्मेटचा वापर न केल्यामुळे 83 चालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आल्याने पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी कठोर भूमिका घेतली आहे.
हेल्मेटचा वापर न केल्यास मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई आणि पाचशे रुपये दंडाची कारवाई होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे नाशिककरांना आता 1 डिसेंबर पासून दुचाकी चालवत असतांना हेल्मेटचा वापर न केल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या काळात ही मोहीम वेगाने सुरू होती मात्र बदलीनंतर मोहीम झाली शिथिल झाली होती.