चंद्रपूर : चंद्रपुरात एका पोलीस निरीक्षकाची (Police Inspector) बदली झाली. त्यानंतर त्यांनी आपल्या कार्यालयातील टॉयलेटचे दार, खुर्ची-टेबल, AC, पडदे आणि दिवे काढून नेले. चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात हा धक्कादायक प्रकार उजेडात आलाय. चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पोलीस अधिकारी बाळासाहेब खाडे यांची याच कार्यालयात गुरुवारी मानव संसाधन विकास विभागात बदली झाली. त्यांनी बदलीने नाराज होत तातडीने शुक्रवारी कार्यालयात येत स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयातील या वस्तू काढून नेल्या. या सर्व वस्तू त्यांनी स्वखर्चाने लावल्याचा त्यांचा दावा आहे. खाडे यांचा स्थानिक गुन्हे शाखेत 2 वर्ष 3 महिन्याच्या कार्यकाळ पूर्ण झाला होता.
विशेष म्हणजे यात दारूबंदीच्या महत्वाच्या कार्यकाळाचा समावेश होता. गुरुवारी पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील 34 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. मात्र बदलीनंतर बाळासाहेब खाडे यांनी केलेल्या या कृत्यामुळे पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
नवीन आलेल्या पोलीस निरीक्षकाने पोलीस दलाची बदनामी होऊ नये म्हणून तातडीने पोलीस निरीक्षकाच्या कार्यालयाच्या डागडुजीला सुरुवात केली. या प्रकरणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे माजी पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनीही बोलण्यास नकार दिला आहे.
खाडे यांना पोलीस निरीक्षक दर्जाच्या शासकीय कार्यालयात अधीक्षक दर्जाची सजावट स्वखर्चाने करण्याची परवानगी कुणी आणि कशी दिली. याशिवाय बदली झाल्यावर हे साहित्य काढून नेल्यावर कोण आणि कशी कारवाई करणार हे प्रश्न अनुत्तरित आहेत.
काही सरकारी कार्यालयात फर्निचर जुने असते. सरकारी पैशातून कधी-कधी त्यांची डागडुजी होत नाही. अशावेळी काही अधिकारी स्वतःच्या पैशातून कार्यालय सजवितात. पण, बदली झाल्यावर त्या वस्तू सहसा काढून नेल्या जात नाही.
पण, संबंधित पोलीस अधिकाऱ्याला ही बाब खटकली. मी माझ्या पैशातून कार्यालय सजविले. मग. बदली झाल्यावर दुसऱ्याच्या कामात या वस्तू येऊ नयेत, असं त्यांना वाटलं. त्यामुळं त्यांनी ही कृती केली असावी. या घटनेमुळे संबंधित पोलीस अधिकारी चांगलेच चर्चेत आले.
सजावटीसाठी वापरलेले पैसे म्हणजे पगारातून खर्च केले की, आणखी कुठून असा प्रश्न उपस्थित होत आहे. याची चौकशी करणे गरजेचे आहे.