अहमदनगर : अज्ञात कारणातून एका ट्रॅक्टर चालक असलेल्या तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना श्रीगोंदा तालुक्यात उघडकीस आली होती. या प्रकरणात आता धक्कदायक खुलासा झाला आहे. सुरुवातीला आत्महत्या वाटणाऱ्या या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. शवविच्छेदन अहवालात ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसात आता कलम 302 प्रमाणे अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्रकरणाचा सखोल तपास सुरु केला आहे. समाधान अंकुश मोरे असे 24 वर्षीय मयत तरुणाचे नाव आहे. तरुणाच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील एरंडोली येथे समाधान मोरे आपल्या कुटुंबासोबत राहत होता. समाधान मढेवडगाव येथे ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होता. ट्रॅक्टर मालक दिलीप मांडे यांनी 14 जुलै रोजी रात्री 9 वाजता घरी येऊन समाधानला कामावर नेले. यानंतर 15 जुलै रोजी मांडे यांनी समाधानच्या घरी फोन करुन त्याची तब्येत बिघडल्याचे सांगितले. यानंतर समाधानच्या भावाने मढेवडगावला जाऊन पाहिले असता समाधानटा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसला.
समाधानने आत्महत्या केल्याचे त्याच्या भावाला सांगण्यात आले. यानंतर श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात मृतेदहाचे शवविच्छेदन करत आत्महत्या केल्याचा दावा डॉक्टरांनी केला होता. मात्र समाधान आत्महत्या करु शकत नाही हे ठामपणे सांगत त्याच्या हत्येचा संशय व्यक्त करत मृतदेहाच्या दुसऱ्या रुग्णालयात शवविच्छेदन करण्याची मागणी करण्यात आली. पोलीस आणि डॉक्टर दोघेही आरोपींना मदत करत असल्याचा नातेवाईकांचा आरोप होता.
कुटुंबीयांच्या मागणीनुसार पुण्यातील ससून रुग्णालयात समाधानच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर समाधानची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर चार दिवसांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाधानची हत्या कुणी आणि कोणत्या कारणातून केली? याबाबत पोलीस सखोल चौकशी करत आहेत.