मुंबई : गुजरातच्या एका प्रसिद्ध हिरेव्यापाऱ्याकडून हिरे खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका दुकलीने त्याला गोड बोलून आपल्या जाळ्यात ओढले. आपल्याला व्यापारासाठी मोठ्या प्रमाणात हिरे खरेदी करायचे आहेत अशी बतावणी त्यांनी केली. तसेच हे दोघे जण गुजरातला हिरे पाहण्यासाठी त्या व्यापाऱ्याकडे गेले. तेथे त्यांनी हिरे खरेदी करण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्याची फसवणूक केली आणि हिरे घेऊन ही दुकली पसार झाली. अखेर त्यांनी व्यापाऱ्याची फसवणूक कशी केली आणि मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रंचने त्यांना कशी आणि कुठून अटक केली हे पाहूयात…
मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने रविवारी गुजरात येथील प्रख्यात हिरे व्यापाऱ्याला फसवणाऱ्या एका दुकलीचा छडा लावल्याचे म्हटले आहे. गुजरातच्या हिरे व्यापाऱ्याला मुंबईतील दोघा जणांनी फेब्रुवारीत संपर्क केला, त्याला धंद्यासाठी मोठ्या प्रमाणात हिरे खरेदी करण्याची थाप मारली. त्यांच्या थापांना भुललेला गुजरातचा व्यापारी त्यांना गुजरातला माल दाखविण्यास तयार झाला. मग हे दोघे जण गुजरातला त्या व्यापाऱ्याकडे हिरे पाहण्यासाठी जायला तयार झाले.
चहाची ऑर्डर देताना घात झाला
पोलिसांनी सांगितले की ही घटना 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 ते 1 वाजताच्या दरम्यान घडली. या हिरे व्यापाऱ्याला त्याने हिरे दाखविण्यासाठी सांगितले. व्यापाऱ्याने सगळे हिरे त्या दोघांच्या समोर पिशवीतून काढून समोर मांडले. तेवढ्यात या दोघा पैकी एकाने चहा मागवा अशी मागणी केली. त्यामुळे चहाची ऑर्डर देण्यासाठी व्यापारी तेथून बाजूला गेला, याचा फायदा घेऊन लागलीच त्यांनी हिऱ्यांच्या जागी नकली काचेचे हिरे त्यात ठेवले, आणि खरे हिरे त्यांनी स्वत: च्या ताब्यात घेतले. आणि त्यांनी पुन्हा हिरे विकत घेण्यासाठी येतो असे सांगत घटनास्थळावरून पलायन केले.
लालबाग आणि कांदिवलीतून अटक
गुजरात येथील व्यापाऱ्याला त्यानंतर खरी गोष्ठ समजली. त्याने यासंदर्भात या दुकली विरोधात गुजरात पोलीसांनी कळविले. तेथे रितसर गुन्हा दाखल झाला. गुजरात पोलिसांना तपासात आरोपी हे मुंबईला पळालेत हे समजले. त्यानंतर मुंबई क्राईम ब्रांचकडे हा तपास सोपविण्यात आला. मुंबई पोलिसांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली एक आरोपी कांदिवली येथे येणार आहे. त्यानंतर क्राईम ब्रांचने कांदिवली येथून एकाला अटक झाली. त्यानंतर लालबाग येथे दुसरा आरोपी येणार आहे हे समजताच पोलिसांनी तेथून त्यालाही अटक केली. गुजरात पोलिसांकडून माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी अवघ्या सात तासांतच आरोपी दुकलीला जेरबंद केले. या दुकलीला गुजरात पोलिसांच्या ताब्यात पुढील तपासासाठी देण्यात आले आहे.