भोपाळ : गुन्हा कधीही लपत नाही असे म्हणतात. तो कधी ना कधी उघड होतोच. असाच एक गुन्हा मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) दोन वर्षापूर्वी घडला होता. दोन वर्षात कुणालाही कल्पना आली नाही की मायलेकांसोबत असे काही झाले असेल. मात्र एका बियरच्या बाटलीने (Beer Bottle) अखेर या गुन्ह्याचा उलगडा (Murder Case Solve) केलाच. यानंतर पोलिसांनी बियर बारमध्ये धाव घेत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी चौकशी केली असता आरोपीने दोन वर्षापूर्वीचा सर्व घटनाक्रम कथन केला.
शिवराज उर्फ राजा चव्हाण असे आरोपीचे नाव आहे. शिवराज एका बियर बारमध्ये मित्रासोबत बियर प्यायला होता. यावेळी त्याने दोन वर्षापूर्वी आपल्या पत्नी आणि मुलीची हत्या केल्यानंतर अद्याप आपण कसे वाचलो हे आपल्या मित्राला सांगितले.
मात्र आरोपीची ही हत्येची कहाणी शेजारी बसलेल्या एका व्यक्तीने ऐकली आणि त्याने पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तात्काळ बियर बारकडे धाव घेत सापळा रचला आणि आरोपीची उचलबांगडी केली.
दोन वर्षांपूर्वी दुहेरी हत्याकांड करूनही मारेकरी मोकाट होता. बियरबारमध्ये मित्रांसोबत दारू प्यायला बसला असताना ‘दोन मर्डर करूनही कसा वाचलो बघा’, अशा बढाया मारण्यास त्याने सुरुवात केली होती.
एक बिअरची बाटली संपवल्यानंतर त्याने दुहेरी हत्याकांडाची कबुली दिली होती. मित्रांसमोरच बोललोय, त्यामुळे कसलाही धोका नाही, असा समज त्याने केला होता. पण शेजारच्या टेबलावर बसलेल्या व्यक्तीने त्याचा गुन्हा उघडकीस आणला.
आरोपी शिवराज उर्फ राजा चव्हाण असे हत्या करणाऱ्या मारेकऱ्याचे नाव आहे. तो ग्वाल्हेरच्या सागर ताल आणि काशीपुरा या ठिकाणी दीर्घकाळापासून राहत होता. दोन वर्षापूर्वी त्याने आपली पहिली पत्नी आणि मुलाला संपवले होते. मात्र याबाबत कुणालाही खबर लागू दिली नव्हती.
आरोपी शिवराजने रतनगड माताच्या जंगलामध्ये पत्नी आस्था हिची 29 मे 2020 रोजी गळा दाबून निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर पत्नीची ओळख पटू नये म्हणून मृतदेहावर रॉकेल ओतून पेटवून दिले होते.
त्यानंतर यंदा मार्च महिन्यात आठ वर्षांच्या मुलाचीही गळा दाबून हत्या केली होती. आरोपी शिवराजने दोन लग्न केली आहेत. आस्था ही त्याची पहिली पत्नी होती तर मनीषा नावाच्या महिलेसोबत त्याने दुसरे लग्न केले होते.
आस्था 2020 पासून बेपत्ता होती. मात्र त्याने या घटनेची कुठेही वाच्यता केली नव्हती. तसेच पत्नी बेपत्ता असल्याची तक्रारही पोलिसांत नोंद केली नव्हती. अखेर दोन वर्षांनंतर मित्रांसोबत दारू प्यायला बसला असताना शिवराजने हत्येच्या कटाचे सत्य उलगडले.
ग्वाल्हेरच्या क्राइम ब्रांचमधील पोलिसांनी दतिया पोलिसांशी संपर्क साधला आणि हत्या झालेल्या महिला आणि तिच्या मुलाची माहिती मिळवली. त्यानंतर ठोस पुरावे जमवून आरोपी शिवराजला रितसर अटक करण्यात आली आहे.