भोपाळ : पती आणि पत्नीच्या संसारात अनेक वेळा छोट्याशा कारणांवरून वादाचे प्रसंग घडत असतात. परंतू आपण शुल्लक गोष्टीवरून रागाच्याभरात उचलले पाऊल नंतर महागात कसे पडते याचे मासलेवाईक उदाहरण मध्य प्रदेशच्या उज्जैन शहरात घडले आहे. येथे एका माणसाने पत्नीने आवडती भाजी न बनविल्याने घरालाच आग लावल्याची घटना घडली आहे. या घटनेतील आरोपी पती घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये अजीब प्रकरण घडले आहे. या प्रकरणातील आरोपी त्याच्या पत्नीने रात्री भाजी ऐवजी डाळ बनविल्याने प्रचंड नाराज झाला. आणि त्याने पत्नीला बेदम मारहाण केली आणि नंतर आरोपीने स्वत:चे घर पेटवून दिले. या घटनेनंतर पती घर सोडून पळून गेल्याचे म्हटले जात आहे.
घराला त्याने असे पेटवले…
रात्री घरी आल्यावर जेवताना पत्नीने ताटात वाढलेले अन्न पाहून या शीघ्रकोपी पतीने स्वत:च्या पत्नीला आधी प्रचंड प्रमाणात मारहाण केली. नंतर संपूर्ण घरात केरोसिन टाकून त्याने आग लावली. त्यामुळे घरातील बहुतांशी वस्तू जळून गेल्या आहेत.
दहा लाखांचे झाले नुकसान…
या प्रकरणा दोषी पतीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या आगीत घरातील सर्वच वस्तू जळाल्या आहेत. तसेच घराजवळची बाईकही जळून गेली आहे. या आगीत एकूण दहा लाखाचे नुकसान झाले आहे. घटनेनंतर आरोपी फरार असून त्याचा पोलिस शोध घेत आहेत.
महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात तिचे पती सोबत सतत भांडण होत होते. तसेच दोन महिन्यांपूर्वी पतीने घराची खिडकी तोडली होती. पोलिसांनी आरोपी पतीविरोधात मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमकी सह तीन गुन्हे दाखल केले आहे. पत्नीने पोलीसांना दिलेल्या तक्रारी नूसार आरोपी पतीवर कलम ३२३, ५०४ आणि ४३६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे, आणि आरोपीचा शोध सुरू केला आहे.