मुंगेर : त्याने तिच्याशी लग्न केल्यानंतर सुखी संसाराची स्वप्नं पाहिली होती. अग्नीच्या साक्षीने सात फेरे मारताना त्यांच्या साता जन्माच्या गाठ बांधल्या गेल्या, परंतू अशी त्याची अर्धांगिणीच त्याचा कधी काळ होईल असे त्याला चुकून स्वप्नातही वाटले नसेल. लग्नाच्या काही वर्षांतच त्याची पत्नी ममताचे संसारात लक्ष नसून तिचे चालचलन काही ठीक नसल्याचे जितेंद्र याच्या लक्षात आले. परंतू स्वैर सुखासाठी तिने पतीचाच प्रियकराच्या मदतीने काटा काढला.
हे धक्कादायक प्रकरण बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातील जमालपुरचे आहे. ईस्ट कॉलनी रेल्वे क्वार्टर 2 – एबी येथे राहणाऱ्या रेल्वे कर्मचारी जितेंद्र कुमार याचे लखीसराय जिल्ह्यातील अभयपुर येथील ममता देवी हिच्याशी साल 2012 मध्ये लग्न झाले होते. लग्नाची काही वर्षे गेली तसे ममता हिचे चालचलन काही ठीक नसल्याचे जितेंद्र याच्या लक्षात आले.
ममता हिच्या चंचल आणि दिलफेक स्वभावाचा जितेंद्र याने धसका घेतला होता. त्याने त्याच्या परीने तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला तरी पण तिचा पाय घसरलाच. ममता हीने जितेंद्रचा चुलत भाऊ अजित कुमार ऊर्फ छोटू याच्याशी संधान बांधायला सुरूवात केली. जितेंद्रचा डोळा चुकून त्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. रात्री उशीरा त्यांची मोबाईलवरून बोलणी सुरू झाली. त्यामुळे जितेंद्र याने त्यांना विरोध करण्यास सुरूवात केली.
जितेंद्रचा चुलत भाऊ अजितकुमार हा स्वत: लग्न झालेला असून एका मुलाचा बाप आहे. परंतू त्याने जितेंद्रच्या पत्नी ममताशी अनैतिक संबंध प्रस्तापित केले. अजितकुमार दिल्लीला काम करीत असून त्याच्या वारंवार गावी भेटीगाठी सुरू झाल्या. घटनेदिवशी अजित दिल्लीवरून आला आणि सकाळी जितेंद्रच्या घरी पोहचला. ज्यामुळे जितेंद्र आणि अजित यांच्यात प्रचंड भांडणे झाली. या भांडणाचा फायदा घेत ममताने आपला प्रियकर अजित बरोबर मिळून जितेंद्रच्या डोक्यात लोखंडी सळईने वार केला. त्याच्या डोक्यावर घाव वर्मी लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
चार वर्षांच्या मुलाने दिली साक्ष
मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी म्हाताऱ्या बापाला फोन आल्यावर समजले, बाप घरी गेला तर मुलगा घराच्या आवारात निपचित पडला होता. पोलीसांनी जेव्हा तपास केला तेव्हा मृत जितेंद्र याच्या चार वर्षांच्या मुलाने जबाब देत पप्पांना अंकल आणि मम्मीने मारल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी पत्नी ममता आणि तिचा प्रियकर अजित याला अटक केली असून मृतदेह पोस्टमार्टेमला पाठवून दिला. जितेंद्रचे म्हातारे वडील योगेद्र राम यांनी आपल्या मुलाला काबाडकष्ठ करून वाढवले होते. आता आपल्याला कोणी नाही तर चार वर्षीय नातवाचा जबाबदारी आपल्याला द्यावी अशी मागणी केली आहे.