मालेगाव – मालेगाव (Malegaon) शहरात बुधवारी रात्री मावसभावाच्या कुटुंबात सुरु असलेले वाद सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर धारदार तलवारीने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात तरुणाचा पाय छाटला गेला असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेला दोन दिवसांचा कालावधी उलटला आहे. तरी संशयित फरार असल्याची माहिती समजली आहे. मात्र या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपास यंत्रणेच्या हाती लागले आहेत. यात पाच ते सहा जणांच्या टोळक्याने मोहम्मद रशीद या तरुणावर तलावारीने वार केल्याचे दिसून येत आहे. या घटनेचे सीसीटीव्ही (CCTV) व्हिडिओ हे सुन्न करणारे आहेत. तसेच दहशत माजवत असल्याचे दिसून येत आहेत. विशेष मालेगावात अशा घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अशा घटना वारंवार घडत असल्याने पोलिसांचा (Police) वचक नसल्याचे उघडकीस आले आहे. शहरात इतकी गुन्हेगारी वाढली आहे की, नागरिक भीतीच्या सावटाखाली जगत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मावस भावाचे भांडण सोडवण्यासाठी आलेल्या तरुणावरती टोळक्याने जोरदार हल्ला केला. त्यामध्ये त्याचा पाय छाटला असल्याची माहिती मिळाली आहे. हे भांडण कशावरुन झालं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु पाय छाटल्याने परिसरात मोठी दहशत माजली असल्याचं चित्र आहे. ही घटना घडून दोन दिवस झाले आहेत. परंतु पोलिसांनी अद्याप कोणाला ताब्यात घेतलेले नाही. सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागले असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहे. त्यामुळे आरोपी ताब्यात घेतल्यानंतर अधिक माहिती उघड होईल. जखमी झालेल्या तरुणावरती जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मागच्या काही महिन्यांपासून मालेगावात अशा पद्धतीची गुन्हेगारी मोठी वाढली आहे. गुन्हेगारांच्या पाठी नेमका कुणाचा आर्शिवाद आहे अशी देखील तिथल्या लोकांना शंका आहे. कारण पाहिजे तशी कारवाई केली जात नसल्याचे उघडकीस आले आहे. हल्ला केल्यानंतर ही टोळी अंधारातून जात असल्याचे सीसीटिव्हीत दिसत आहे. अनेक दिवसांपासून अशा टोळ्या मालेगाव सक्रीय असल्याच्या पाहायला मिळत आहेत. मारहाण करणे हा एकमेव उद्देश असल्याचं अनेक व्हिडीओतून वाटत आहे.