नाशिक – नाशिकच्या (Nashik) नांदगाव (Nandgaon) तालुक्यात एका 22 वर्षीय तरुणाचा गळा व हात-पाय दोरीने बांधून नाग्या-साक्या धरणात (Nagya-Sakya Dam) फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिस कसून चौकशी करीत आहेत. लग्नाच्या वरातीत नाचायला गेलेला तरूण घरी परतल्याने घरचे चिंतेत होते. कुठेचं सुगावा लागत नसल्याने घरच्यांनी अखेरीस पोलिस स्टेशन गाठलं. पोलिसांनी तपास केला परंतु त्यांनाही तरूणाचा कुठे सुगावा लागला नाही. काही कॉलेजचे विद्यार्थी नाग्या-साक्या धरण परिसरात फिरायले गेले होते. त्यांना पाण्यात मृतदेह तरंगताना दिसल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती तिथल्या स्थानिक नागरिकांना दिली.
मंगळवारी दुपारी नाग्या-साक्या धरणातील सांडव्याजवळ मृतदेह तरंगत असल्याचे काही कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी ही माहिती तिथल्या स्थानिक लोकांना सांगितली. ही बातमी पोलिसांच्या कानावर गेल्यानंतर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अमोल धोंडीराम व्हडगर रा.नांदूर याचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले.
नांदूर गावातील केसकर यांच्याकडे असलेल्या वरातीत नाचून येतो असे सांगून मयत अमोल धोंडीराम व्हडगर हा रविवारी सायंकाळी घरातून गेला होता. मात्र त्यानंतर तो घरी परतलाच नाही. मयत अमोलच्या नातेवाईकांनी दोन दिवस शोध घेवून मंगळवारी सकाळी हरवल्याबाबत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला होता. मंगळवारी दुपारी काही कॉलेजचे विद्यार्थी नाग्या-साक्या धरणाकडे फिरायला गेलेले असतांना धरणाच्या सांडव्याजवळ एक मृतदेह तरंगत असताना त्यांना आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत हा मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरविली असून रात्री उशिरा नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी मनमाड येथील पोलिस उपविभागीय अधिकारी समिरसिंह साळवे, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे आदींनी भेट देत पुढील तपास सुरू केला आहे.