कल्याण / 31 जुलै 2023 :
कल्याण-डोंबिवलीत चोऱ्यांचं सत्र थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. चोरटेही चोरी करण्यासाठी विविध फंडे वापरत आहेत. अशीच एक घटना कल्याण पश्चिमेत उघडकीस आली आहे. भंगार विकत घेण्याच्या बहाण्याने आरोपी सोसायट्यांमध्ये घुसायचा आणि सोसायटीतील लोखंडी सामान घेऊन पसार व्हायचा. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आणि चोरट्याची पोलखोल झाली. भरदिवसा होत असलेल्या या घटनांनी एकच खळबळ उडाली आहे. दिवसाढवळ्या घडणाऱ्या या घटनांमुळे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे दिसून येते. याप्रकरणी खडकपाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सदर चोरटा परिसरात भंगारवाल्याच्या वेशात फिरायचा. भंगार विकत घेण्याच्या बहाण्याने सोसायट्यांमध्ये घुसायचा. दुपारच्या वेळी सोसायट्यांमधील शांततेचा फायदा घेत सोसायटीतील भंगार चोरुन पसार व्हायचा. कल्याण बिर्ला कॉलेज परिसरातील जितेश सोसायटीमध्ये सोसायटीत शांतता असल्याचा फायदा घेत एक भंगारवाला सोसायटीत शिरला. आधी भंगार बाटलीवाले असा ओरडत पूर्ण सोसायटीमध्ये रेखी केली. त्यानंतर सोसायटीत असलेले जिमच्या साहित्यासह इतर लोखंडी वस्तू लंपास केल्या.
सोसायटीतील साहित्या गायब झाल्याचे लक्षात येताच सोसाटीवाल्यांनी सीसीटीव्ही तपासले असता चोरट्याचे बिंग फुटले. यानंतर सीसीटीव्ही फुटेजसह सोसायटीतील रहिवाशांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे आणि आरोपींची हिंमत पाहता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.