अभिनेते अनुपम खेर यांच्या ऑफीसमध्ये चोरी करणाऱ्यांना अखेर अटक

| Updated on: Jun 22, 2024 | 8:01 AM

प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने खळबळ माजली होती. आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. अनुपम खेर यांच्या कार्यालयात डल्ला मारणाऱ्या दोन्ही चोरट्यांना अखेर अटक करण्यात आली आहे.

अभिनेते अनुपम खेर यांच्या ऑफीसमध्ये चोरी करणाऱ्यांना अखेर अटक
Follow us on

प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने खळबळ माजली होती. अंधेरीतील वीरा देसाई रोड परिसरात अनुपम खेर यांच्या कार्यालयातून चित्रपटांच्या निगेटिव्ह आणि लाखो रुपये चोरले होते. मात्र आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. अनुपम खेर यांच्या कार्यालयात डल्ला मारणाऱ्या दोन्ही चोरट्यांना अखेर अटक करण्यात आली आहे. रफिक शेख आणि मोहम्मद खान अशी आरोपींची नावं असून त्या दोघांनाही बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. डी एन नगर पोलिसानी ही कारवाई करत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या.

19 जून रोजी खेर यांच्या अंधेरीतील वीरा देसाई रोडवरील आलिशान कार्यालयात चोरी झाली होती. या घटनेची माहिती खुद अनुपम खेर यांनीच त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली होती. तसेच या घटनेनंतर चोरट्यांनी त्यांच्या ऑफीसच्या दरवाज्याची केलेल्या अवस्थेचा व्हिडीओ देखील अभिनेत अनुपम खेर यांनी शेअर केला होता. दोन्ही चोरट्यांनी खेर यांच्या अंधेरीतील कार्यालयात शिरकाव केला आणि तेथील पैसे तसेच चित्रपटांच्या निगेटिव्ह्ज चोरल्या. ही चोरी उघडकीस आल्यानंतर खेर यांनी आंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. चोरट्यांनी जवळपास ४ लाख रुपये आणि खेर यांच्या मैने गांधी को नहीं मारा या सिनेमाचे निगेटिव्ह चोरले होते.

अनुपम खेर यांनी शेअर केला होता व्हिडीओ

सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असलेले अनुपम खेर यांनी चोरीच्या या घटनेनंतर त्यांच्या कार्यालयाची चोरट्यांनी जी दुरावस्था केली, त्याचा एक व्हिडीओ शेअर केला. या संदर्भात त्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहीले, की काल रात्री दोन चोरांनी माझ्या वीरा देसाई येथील कार्यालयाचा दरवाजा तोडून त्यात प्रवेश केला. अकाऊंट डिपार्टमेंट्सची संपूर्ण तिजोरी आणि आमच्या कंपनीच्या द्वारे निर्मिती केलेल्या चित्रपटाच्या निगेटिव्ह एका बॉक्समध्ये होत्या. या गोष्टी ते उचलून घेऊन गेले आहेत. आमच्या कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे नोंदविली आहे. त्यांनी पुढे सांगितले की पोलिसांनी आश्वस्त केले असून या प्रकरणाचा लवकर छडा लावून चोरट्यांना पकडून आणू असे म्हटले. कारण सीसीटीव्हीत दोघे चोर सामानासह ऑटोत बसताना दिसत आहेत. देव त्यांना सद्बुद्धी देवो. हा व्हिडीओ माझ्या कर्मचाऱ्यांनी पोलिस येण्यापूर्वी चित्रीत केला आहे.