सोलापूर : (Tree plantation) वृक्ष लागवडीसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक ना अनेक योजना राबवल्या जात आहेत. गेल्या काही वर्षापासून 1 जुलैचे वृक्ष संवर्धन दिनाचे औचित्य साधून कोट्यावधी झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठरवून दिले जाते. मात्र, यामध्येही पंढरपूर येथील (Department of Social Forestry) सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीचे बोगस कागदपत्रे सादर करुन कोट्यावधींची बीले उचलली आहेत. या वृक्ष लागवड मोहिमेतून 1 कोटी 25 लाखाचा (Corruption in work) अपहार केल्याचे समोर आल्याने सामाजिक वनीकरण विभागाचे तीन अधिकारी आणि इतर आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार आता चौकशीही सुरु आहे.
33 कोटी वृक्ष लागवड योजना ही केवळ नावालाच आहे. प्रत्यक्षात ना लागवड होतेय ना वृक्षांचे संवर्धन. ही बाब सामाजिक सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांच्या निदर्शनास आली. शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड योजनेत अधिकाऱ्यांनी संगणमत करून आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार पंढरपूर येथील न्यायालयात केली होती. त्यानंतर न्यायलयाने याबाबत चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले होते. त्यानुसार पोलिसांनी चौकशी करून तीन सामाजिक वनीकरण विभागातील अधिकारी आणि इतर आठ जणांना ताब्यात घेतले आहे.
पर्यावरणाचे संवर्धन व्हावे म्हणून राज्य सरकारकडून ही महत्वाची योजना राबवली जाते. असे असतानाही सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनीच यामध्ये अनियमितता केली आहे. त्यामुळे कोर्टाच्या आदेशाने पोलीसांनी चौकशी केली असता सामाजिक वनीकरण विभागाने वनरक्षक संतोष नवघरे वनक्षेत्रपाल किशोर अहिरे वनमजूर अंबना जेऊर तसेच अनोळखी पाच जणांवर वृक्ष लागवड योजनेत बोगस मजूर दाखवून सुमारे एक कोटी 25 लाख रुपयांचा वापर केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सरकरी योजनेत अपहार केल्याप्रकरणी आता सामाजिक वनीकरण विभागाने वनरक्षक संतोष नवघरे वनक्षेत्रपाल किशोर अहिरे वनमजूर अंबना जेऊर यांच्यासह इतर आठ जणांवर काय कारवाई होणार हे पहावे लागणार आहे. पण पंढरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी केलेल्या तक्रारीवरुन कोट्यावधीचा भ्रष्टाचार समोर आला आहे.