मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वारंवार चोऱ्या करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला मुंबई पोलिसांनी अटक केली. मात्र त्याच्या चौकशी दरम्यान समोर आलेल्या माहितीने एकच खळबळ माजली आहे. सतत चोरी करणाऱ्या त्या आरोपीला त्याची आईच हे गुन्हे करायला लावायची आणि त्यासाठी तीच त्याला ड्रग्सही द्यायची असे पोलीस तपासात समोर आले आहे. यानंतर तो नशेत गुन्हे करत असे. आरोपीचे नाव कृष्णा महेस्कर (वय 24) असे आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्याच्यावर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात चोरी आणि घरफोडीचे 22 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांसमोर हे धक्कादायक सत्य समोर आलं. हे ऐकल्यावर पोलिसांनाही आश्चर्य वाटले.
“म्हैसकर हा एक सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या सर्व गुन्हेगारी कारवायांमध्ये त्याची आई विजेता म्हैसकर (50) हिची महत्त्वाची भूमिका होती. चोरीपूर्वी ती त्याला अमली पदार्थ द्यायची. त्यानंतर त्याने चोरी केलेलं सामान आणि पैसे ती स्वतःकडेच ठेवायची, असे काळाचौकी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेंद्र चव्हाण म्हणाले. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुलगा आणि त्याची आई हे दोघेही काळाचौकी भागातील रहिवासी होते. पोलिसांनी आरोपी कृष्णा रवी महेस्कर याला आग्रीपाडा परिसरातून अटक केली, तर त्याची आई अद्यापही फरार आहे. तिला पकडण्यासाठी पोलीसांनी अनेक ठिकाणी छापे टाकले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
लाखोंची वायर चोरणाऱ्या दोघांना अटक
दरम्यान दुसऱ्या एका घटनेत मुंबी पोलिसांनी वायर चोरीच्या आरोपाखाली दोघांना अटक केली होती. दोघेही तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीचे सदस्य असल्याची माहिती समोर आली. अशोक शिंदे (43) आणि राजकुमार यादव (26) अशी आरोपींची नावे आहेत. अशोक शिंदे हा व्यवसायाने मजूर असून राजकुमार हा ड्रायव्हर आहे. टेलिफोन एक्सचेंजसाठी वापरल्या जाणाऱ्या ६० मीटरच्या तांब्याच्या तीनपीयूसी केबल गायब असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याची किंमत 2.16 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. केबल चोरीची तक्रार मिळाल्याचे तपास अधिकारी एपीआय लीलाधर पाटील यांनी सांगितले. त्याच दिवशी त्यांचे डिटेक्शन कर्मचारी गस्तीवर होते. ही घटना घडली त्या दिवशी आरोपी एक ऑटोमधून भरधाव वेगाने जाताना दिसले होते. त्यांच्यावर संशय आल्याने थांबवून त्यांची झडती घेतली असता ऑटोमध्ये 28 मीटर केबलचे 13 तुकडे आढळून आले. त्याची किंमत सुमारे 2.16 लाख रुपये होती. यानंतर गस्ती पथकाने दोघांना ऑटोसह ताब्यात घेतले आणि माल जप्त केला.