दिल्ली : गुन्हेगारी रहस्यांची उकल करणारी CID ही टीव्ही जगातातील सर्वात लोकप्रिय मालिका. CID टीमची एखाद्या गुन्हेगाराची उकल करत असताना अनेक इंटरेस्टींग पुराव्यांचा आधार घेते. मात्र, CID सिरीयल पेक्षा भारी पद्धतीने एका गुन्हेगारी घटनेची उकल झाली आहे. डासांच्या डीएनएमुळे चोर पकडला गेला आहे. चीनमध्ये ही घटना घडली होती. चोरांच्या रक्ताच्या नमुन्याच्या आधारे पोलिस हे गुन्हेगारापर्यंत पोहचले आहे. चोर पकडण्यासाठी तपास अधिकाऱ्यांनी वापरलेल्या या इंटेलिजन्सचे सर्वत्र कौतुक होत आहे. गुन्हा घडल्या नंतर अवघ्या 20 दिवसांच्या आतच पोलिसांनी आरोपीला गजाआड केले आहे.
एका चोरीच्या गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी चीनमधील तपास अधिकाऱ्यांनी अजब असे तंत्रज्ञान वापरले आहे. ज्या ठिकाणी चोरी झाली होती त्या ठिकाणी पोलिसांना एक मलेला डास सापडला. या मेलेल्या डासाच्या शरीरातील रक्ताच्या डीएनएच्या आधारे अधिकाऱ्यांनी चोराला शोधले.
घरात कुणी नसताना चोरी करण्यासाठी चोर घरात घुसला होता. त्यामुळे या चोराने घरातच मुक्काम केला होता. तेव्हा त्या घरातील डास त्याला त्रास देत होते आणि अनेक डास त्याला चावले. त्याने डासांना पिटाळण्याचा प्रयत्न केला होता आणि हातानेही डास मारले होते. मेलेले अनेक डास तपास अधिकाऱ्यांना घरात सापडले. त्या डासांच्या शरीरातील रक्ताचा अभ्यास करून त्यात त्यांना जे डीएनए नमुने सापडले. त्या डीएनएचे नमुने त्यांनी त्यांच्याकडील रेकॉर्डशी तपासून घेतले. तेव्हा तो नमुना रेकॉर्ड मधील एका गुन्हेगाराला मॅच होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्या आधारे त्या गुन्हेगाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
चीनमधील फुजियन प्रांतातील पुजो या शहरात ही चोरीची घटना घडली होती. 19 व्या दिवशी चोर पोलिसांना सापडला. मेलेल्या मच्छरच्या मदतीने पोलिस चोरापर्यंत पोहोचले. या गुन्ह्याची उकल कशी झाली याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.
चोराने ज्या डासांना मारले होते त्या डासांनी अखेर बदला घेतला अशा प्रकारच्या काही गमतीशीर प्रतिक्रियाही सोशल मीडियावर येत आहेत. चोर त्या घरात मुक्काम न ठोकता फक्त चोरी करुन गेला असता तर त्याला ना मच्छर चावले असते ना तो पोलिसांना सापडला असता अशी कमेंटही एकाने केली आहे.