Nashik News : नाशिकच्या (Nashik) चोरट्यांचा चोरी करण्याचा एक अजब प्रकार समोर आला आहे. त्यामुळे नाशिक पोलीसांची (Nashik Police) डोकेदुखी वाढली असून तपासाचे मोठे आवाहन पोलीसांसमोर उभे राहिले आहे. नाशिक शहरातील गंगापूर शिवार, शिवाजीनगर आणि अहिल्याबाई होळकर चौक परिसरात चोरट्यांनी फक्त रिक्षाचे टायर (Rikshaw) चोरल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली असून चोरट्यांच्या टायर चोरीची चर्चा होऊ लागली आहे. एकाच रात्रीत 7 रिक्षांचे 13 टायर चोरीला गेल्याने हे चोरटे फक्त रिक्षांचेच टायर का चोरतात ? याचा शोध पोलीसांना घ्यावा लागणार आहे.
नाशिक शहरात रिक्षाचे टायर चोरी करण्याची टोळी सक्रिय असल्याने नाशिक पोलीसांसमोर गुन्ह्याची मोठी उकल करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
नाशिक शहरातील गंगापूर शिवार, अहिल्याबाई होळकर चौक आणि शिवाजीनगर येथील रिक्षाचे टायर गेल्याच्या तक्रारी पोलीसांना प्राप्त झाल्या आहेत.
पोलीसांना दिलेल्या तक्रारीत शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या जयवंत कचरू पालवे यांनी घराजवळ रिक्षा पार्किंग केली होती. तर गुरुवारी त्यांच्या रिक्षाचे तिन्ही चाके नव्हती.
तिन्ही चाके चोरून नेल्याने पालवे यांनी पोलिसांत धाव घेत संबंधित घटनेची माहिती देत तक्रार दिली आहे.
याशिवाय याच परिसरासह गंगापूर शिवार परिसरात देखील 6 रिक्षाचे टायर चोरी केले आहेत. काही रिक्षाचे दोन तर काहींचे एक असे टायर चोरी केले आहे.
शहरात टायर चोरी करणाऱ्या टोळी रिक्षा चालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलीसांच्या तपासाकडे तक्रारदारांचे लक्ष लागून आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे रिक्षा चालक रात्री जागे राहून असून अधूनमधून रिक्षावर नजर ठेवत आहे. या शिवाय रिक्षा चालकांना काही निदर्शनास आल्यास पोलिसांनं कळविण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, चोरट्यांचा नाशिकमधील नवा फंडा चर्चेचा विषय ठरत असून रिक्षा चालकांना दिलासा देण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहे.