टॉयलेटमधून बोगदा खोदून चोरांनी लांबवले कोट्यावधींचे आयफोन, कुठे घडला हा धक्कादायक प्रकार ?

| Updated on: Apr 22, 2023 | 5:02 PM

Apple Store : हे चोर शेजारील कॉफी शॉपमधून ॲपल स्टोअरमध्ये घुसले. त्यांनी तब्बल 4.10 कोटी रुपये किमतीचे आयफोन चोरले.

टॉयलेटमधून बोगदा खोदून चोरांनी लांबवले कोट्यावधींचे आयफोन, कुठे घडला हा धक्कादायक प्रकार ?
Image Credit source: tv9
Follow us on

वॉशिंग्टन : ओटीटीवरील मनी हाइस्ट (Money Heist) ही वेबसिरीज सर्वांनाचा माहीत आहे. बहुतांश लोकांनी ती पाहिलीही असेल. त्यामधील चोरीची पद्धत पाहून आपण थक्क होतो. पण अमेरिकेत चोरट्यांच्या एका टोळीने मनी हाइस्टलाही मागे टाकत चोरीसाठी एक अशी शक्कल लढवली, की ते पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. या चोरट्यांनी चक्क ॲपल स्टोअरमधून (Apple Store) 436 आयफोन (iPhone) चोरी केले आहेत. त्यांची किंमत कोट्यावधी रुपये आहे. ही धक्कादायक घटना अमेरिकेतील सिॲटल येथील आहे. ही चोरी पाहून पोलीस देखील हादरले आहेत. व्यवस्थित प्लानिंग करून मगच ही चोरी करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांच्या सांगण्यानुसार, चोरांना केवळ ॲपल स्टोअरचीच नव्हे तर ते स्टोअर ज्या मॉलमध्ये आहे, त्याचीही खडानखडा माहिती होती.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची माहिती कॉफी शॉपचे सीईओ माइक अ‍ॅटकिन्सन (Mike Atkinson)यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. आता पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. या चोरीनंतर आता कॉफी शॉपचे कुलूप बदलावे लागणार असल्याचे माईक सांगतात. यासाठी सुमारे 74 हजार रुपये खर्च झाले आहेत. चोर आपल्या दुकानाचा असा वापर करतील असे वाटले नव्हते, असे ते म्हणाले.

 

कशी केली कोट्यावधींची चोरी ?

ही चोरी म्हणजे अगदी एखाद्या चित्रपटाची स्टोरी वाटेल अशीच आहे. सिॲटल येथे ही घटना घडली आहे. त्यासाठी चोरट्यांनी प्रथम या ॲपल स्टोअरला लागून असलेल्या कॉफी शॉपचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कॉफी शॉपच्या भिंतीलगत बाथरूम आहे. स्थानिक न्यूज चॅनलने दिलेल्या माहितीनुसार, चोरांनी प्रथम कॉफी शॉपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ॲपल स्टोअरच्या मागील खोलीत पोहोचण्यासाठी त्यांनी या कॉफी शॉपमधील बाथरूमच्या भिंतीला टारगेट करत मोठे छिद्र पाडले.

त्यातून चोरांनी ॲपल स्टोअरमध्ये प्रवेश केला. नंतर त्यांनी स्टोअरमधील सुमारे 4 कोटी रुपयांचे 436 आयफोन चोरले आणि ते पसार झाले. एवढंच नव्हे तर पकडले जाऊ नये म्हणून चोरांनी स्टोअरमधील सीसीटीव्ही कॅमेरेही फोडले.

कॉफी शॉपचे झाले नुकसान

या चोरीमुळे एकच खळबळ माजली असून चोरीची ही पद्धत पाहून पोलिसही हैराण झाले आहेत. कॉफी शॉपचे सीईओ माइक यांनी वृत्तवाहिनीला सांगितले की, सकाळी मला फोन आला तेव्हा कळलं की ॲपल स्टोअरमध्ये चोरी झाली आहे. माझा तर त्यावर विश्वासच बसत नव्हता. ॲपल स्टोअरमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी माझ्या दुकानाचा वापर करण्यात आल्याचे पोलिसांनी मला सांगितले तेव्हा मी हैराणच झालो. माईक ॲटकिन्सन यांनीही या बोगद्याचे छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यात त्यांनी या घटनेचा उल्लेखही केला आहे.

चोरांनी आयफोन तर चोरलेच पण सोबतच दुकानाचे लाखो रुपयांचे नुकसान देखील केलं आहे. या चोरांना लवकरात लवकर पकडलं जाईल असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.