सांगली | 9 डिसेंबर 2023 : सांगलीतील दोन चोरांनी उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये धुमाकूळ घातला आहे. कानपूरमध्ये या चोरांनी कोट्यवधीचं सोनं पळवलं आहे. कानपूरच्या गलाई व्यावसायिकांचे 16 कोटींचे सोने घेऊन या चोरांनी पोबारा केला आहे. दोघेही मूळचे सांगली जिल्ह्यातील आहेत. सोनं नेत असतानाचा त्यांचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आला आहे. कानपूर पोलिसांची एक टीम आरोपीच्या शोधासाठी सांगली जिल्ह्यात दाखल झाली आहे. पोलिसांनी या दोघा संशयिताच्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी सुरू केली आहे.
सांगलीतील हे दोन्ही रहिवाशी कानपूरमध्ये गलाई व्यवसायानिमित्ताने गेले होते. मात्र तिथे गेल्यावर या दोघांनी गलाई व्यावसायिकाचे तब्बल 16 करोड रुपयांचे सोने आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केला. संपत शिवाजी लवटे आणि महेश विलास मस्के असे या संशितांची नावे असून पोलिसांनी त्यांचे फोटोही जारी केले आहेत. तसेच त्यांचा कसून शोध घेतला जात आहे.
संपत हा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बामणी गावचा आणि महेश हा पलूस तालुक्यातील नागराळे गावचा रहिवासी आहे. सांगली पोलिसांच्या मदतीने सोने घेऊन पळालेल्या दोघांचा शोध घेतला जात असून अद्याप तरी दोघांचा थांगपत्ता लागलेला नाही. कानपूर पोलिसांची एक टीम आरोपीच्या शोधासाठी सांगली जिल्ह्यात दाखल झाली आहे. त्यामुळे सध्या या दोघा संशयिताच्या कुटूंबातील सदस्यांची कानपूर पोलिस आणि स्थानिक पोलीस चौकशी करत आहेत. सोने घेऊन जात असतानाचे त्यांचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागले आहेत.
कानपूर पोलिसांनी याबाबत तातडीने तपास यंत्रणा लावली असून सांगली जिल्ह्यात पोलिसांनी तळ ठोकला आहे. विट्यातही याबाबतचा तपास सुरु आहे. चोरी करणारे संशयित आरोपी फरार असल्याने कानपूर पोलिसांनी सांगली जिल्ह्यात आपली यंत्रणा कामाला लावली आहे.
या आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी एसआयटीची एक टीम स्थापन केली आहे. तसेच डीसीपी सेंट्रलच्या सर्व्हिलान्स टीमच्या 11 सदस्यांची टीम स्थापन केली होती. संपत आणि महेश या दोघांचेही पासपोर्ट तयार करण्यात आलेले नाही. त्यामुळे ते परदेशात पळून जाण्याची शक्यता फार कमी असल्याचं पोलिसांनी व्यक्त केली. मात्र, हे दोघे नेपाळला पळून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेपाळच्या सीमावर्ती भागात आणि आसपासच्या जिल्ह्यात दोन्ही कारागिरांची माहिती देण्यात आली आहे.