बारामती / नविद पठाण : दागिने पहाण्याचा बहाणा करत सराफाला लुटल्याची खळबळजनक घटना बारामती तालुक्यातील सुपे येथे घडली आहे. दागिने लुटून दरोडेखोर पळून जाण्याच्या तयारीत असतानाच गोंधळ उडाल्याने आरोपींनी गोळीबार केला. यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात तीन जण जखमी झाले असून, एकावर साळुंके हॉस्पिटमध्ये उपचार चालू आहेत. मात्र एकाला पकडण्यात ग्रामस्थांना यश आले आहे, तर तीन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. पवन विश्वकर्मा असे अटक आरोपीचे, तर सागर दत्तात्रय चांदगुडे, अशोक भागुजी बोरकर, सुशांत क्षिरसागर अशी पळून गेलेल्या तिघांची नावे आहेत.
बारामती तालुक्यातील सुपे येथील बाजार मैदानानजीक सुयश सुनिल जाधव यांचे महालक्ष्मी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. या दुकानात चार जण आले. त्यांनी दागिने खरेदी करण्याच्या बहाणा केला. यावेळी दागिने पाहण्याचा बहाणा करुन चौघांनी दुकानातील 15 तोळे सोने लुटले. सोने पळवण्याच्या प्रयत्नात दरोडेखोरांनी दुकानात गोळी झाडली.
दुकानातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना बाहेर उभे असलेल्या सागर चांदागुडे यांनी दरोडेखोराला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी दरोडेखोराने गोळी झाडली. यात चांदागुडे जखमी झाले. अशोक बोरकर यांच्या पोटाला दोन गोळ्या चाटून गेल्या, तर सुशांत क्षिरसागर यांच्या पायाला गोळी लागली. घटनेची माहिती सुपे पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस नाईक दत्तात्रय धुमाळ, नाजीर रहीम शेख, राजकुमार लव्हे हे घटानस्थळी दाखल झाले.
पोलिसांनी दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यातील एकाला पकडण्यात ग्रामस्थांना यश आले, तर तीन जण चारचाकी गाडीतून फरार झाले. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी भेट दिली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन काळे, पोलीस उपनिरिक्षक सलीम शेख करीत आहेत.