कल्याण / 14 ऑगस्ट 2023 : कल्याण-डोंबिवलीत चोऱ्यांचं सत्र थांबण्याचं नावच घेताना दिसत नाही. वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. कल्याण पूर्वेला एकाच परिसरात एकाच आठवड्यात तीन घरफोड्या उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी कल्याण पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्य दोन फिर्यादी बाहेरगावी असल्याने दोन गुन्हे अद्याप दाखल करण्यात आले नाहीत. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. बंद घरातून मौल्यवान वस्तू चोरुन चोरट्यांनी पोबारा केला. वाढत्या चोरीच्या घटना पाहत पोलिसांचा गुन्हेगारांवर धाकच राहिला नसल्याचे चित्र आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा परिसरात गेल्या आठवड्यात तीन घरफोड्या झाल्याची घटना घडल्या आहेत. चोरटे बंद घराला टार्गेट करतात. मग पकडले जाऊ नये म्हणून शेजारच्या घराला बाहेरुन कडी लावतात आणि घरफोडी करतात. चिकणीपाडा परिसरात अशाच प्रकारे चोरटे चोरी करुन पसार झाले. या घटनेमुळे नागरिक भीतीचे वातावरण आहे.
पहिली चोरी कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा परिसरात राहणाऱ्या स्वप्नाली किंजळकर याच्या घरात झाली. किंजाळकर या 5 ऑगस्ट रोजी आपल्या नातेवाईकांच्या घरी गेल्या होत्या. त्याच रात्री अज्ञात चोरट्यांनी सेफ्टी डोअर आणि कुलूप उचकटून घरात प्रवेश केला. घरातील दागिन्यांवर डल्ला मारत जवळपास 2 तोळे दोन ग्रॅम सोने आणि 39 हजार रोख असा 1 लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. दुसऱ्या दिवशी किंजळकर कुटुंबीय घरी आल्यानंतर चोरी झाल्याची बाब निदर्शनास आली. सदर प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजसह कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी घटना 11 ऑगस्ट रोजी पुन्हा याच परिसरातील विठ्ठल मंदिरजवळ घडली. शेजारील बंद घरे चोरांनी टार्गेट करत या घरांच्या आजूबाजूला असणाऱ्या शेजाऱ्यांच्या घराला बाहेरून कडी लावून घरफोडी केली. या घरातील मुद्देमाल घेऊन चोरट्यांनी पळ काढला. पहाटे या परिसरातील एका महिलेने सर्वांच्या घराला बाहेरून कडी पाहून त्यांच्याकडे चौकशी केली असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. मात्र दोन्ही घरातील माणसं बाहेरगावी गेली असल्याने या घटनेत कुठलीही तक्रारदार आला नाही.