कल्याण : पंजाबमधील सोनू खत्री गँगच्या वाँटेड असलेल्या तीन आरोपींना कल्याणमधील इराणी वस्तीतून अटक केली आहे. तिघेही खत्री गँगचे शार्पशूटर आहेत. शुभम सिंग, गुरमुख नरेशकुमार सिंग, अमनदिप कुमार गुरमिलचंद उर्फ रॅचो अशी अटक केलेल्या शार्पशूटर्सची नावे आहेत. दहशतवाद विरोधी पथक, काळाचौकी, विक्रोळी, ठाणे आणि नवी मुंबई युनिट तसेच फोर्स वन आणि जलद प्रतिसाद पथक, मुंबई पोलीस अधिक्षक फोर्स आणि कल्याण खडकपाडा पोलीस असं 200 हून अधिक पोलिसांनी हे कॉम्बिग ऑपरेशन केलं.
पंजाबमधील एका हत्या प्रकरणात हे आरोपी फरार होते. पंजाबमधून पळून हे आरोपी कल्याणमधील इराणी वस्तीत लपून बसले होते. सहा महिन्यांपासून हे आरोपी आंबिवलीत लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या आरोपींच्या शोधात असलेल्या पंजाब पोलीस आणि एटीएसच्या पथकाने कल्याणच्या खडकपाडा पोलीस स्टेशनच्या मदतीने इराणी वस्तीत छापा टाकला. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
कल्याणनजीक आंबिवली परिसरात इराणी वस्ती ही अट्टल गुन्हेगारांची वस्ती म्हणून ओळखली जाते. या वस्तीतून पोलिसांवरही अनेकदा जीवघेणे हल्ले झालेत. या ठिकाणाहून 3 आरोपींना अटक करण्याच मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. या आरोपींवर बरेच गुन्हे दाखल असून पंजाबमधील ड्रग प्रकरणातही हे आरोपी वॉन्टेड होते.
पंजाबमधील एका नेत्याची भरदिवसा पेट्रोल पंपावर गोळ्या झाडून हत्या केल्याच्या आरोपात हे तिघे फरार होते. हे तिन्ही आरोपी कल्याणातील आंबिवली एनआरसी कॉलनी परिसरात राहत असल्याची माहिती पंजाबच्या अँटी गँगस्टर टास्क फोर्सचे डीसीपी राजन परविंदर आणि त्यांच्या पथकाला मिळाली होती.
मात्र आंबिवलीमधून आरोपीना पकडणे सहज शक्य नसल्यानेच या आरोपींना पकडण्यासाठी परविंदर यांनी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाची मदत घेतली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पंजाब दहशतवाद विरोधी पथक आणि महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकासह आठ पथकातील अधिकारी आणि पोलिसांनी आंबिवली एनआरसी कॉलनीत सापळा रचून तिन्ही आरोपीना राहत्या घरातून अटक केली.
या आरोपींवर हत्येसह अनेक गुन्ह्याची नोंद आहे. त्यांच्या अटकेमुळे अनेक गुन्ह्यांची उकल करणे शक्य होणार असल्याचे मोहाली दहशतवाद विरोधी पथकाचे पडीएसपी राजन परविंदर यांनी सांगितले. या आरोपींना कल्याण न्यायालयात हजर करून त्यांना पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.