गोंदिया : जिल्ह्यातील सडक अर्जुनी डुंगीपार पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गोंदिया ते कोहमारा मार्गावर बुधवारी भीषण अपघात झाला. या अपघातात एक प्रवासी जागीच ठार झाला असून अन्य दोन प्रवाशांना रुग्णालयात नेत असताना उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची तीव्रता अत्यंत भीषण होती. पाटेकुर्रा गावाजवळ काळी-पिवळी टॅक्सी आणि ट्रकची समोरसमोर धडक झाली. त्यात दोन्ही गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या गावावर शोककळा पसरली आहे.
भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या तीन प्रवाशांचा अपघातानंतर काही वेळातच मृत्यू झाला. श्यामसुंदर बंग (वय 78 वर्ष रा. गोरेगाव), सूरज मुनेश्वर (वय 24 वर्ष रा. आमगाव), अंबिका पांडे (वय 63 वर्ष रा. सडक अर्जुनी) असे मृतांची नावे आहेत.
अपघातामध्ये इतरही सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे समजते. त्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात पोलीस बंदोबस्त पुरवण्यात आला आहे.
अपघातग्रस्त ट्रक गोंदिया येथून कोहमाराकडे जात होता. पाटेकुर्राजवळ ट्रकचा समोरील डाव्या बाजूचा टायर फुटल्याने ट्रक काळी-पिवळी टॅक्सीवर आदळला. या अपघाताची डुग्गीपार पोलिसांनी नोंद केली असून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघातामुळे जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त वाढवून खबरदारी घेतली जात आहे, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर यांनी दिली.