पुणे / अभिजीत पोते (प्रतिनिधी) : हडपसर आणि इतर भागात दहशत माजविणाऱ्या कोयता गँगमधील तिघांच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी उसाच्या फडातून पसार झालेल्या दोघांना पाठलाग करुन ताब्यात घेतले. तसेच, एकाला नगर जिल्ह्यातील पाथर्डी परिसरातून अटक केली. अटक केलेल्यांमध्ये कोयता गँगच्या म्होरक्याचा समावेश आहे. स्वप्नील उर्फ बिट्ट्या संजय कुचेकर, पंकज गोरख वाघमारे आणि सत्यम विष्णू भोसले अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
मांजरी परिसरात 3 जानेवारी रोजी दरोडा आणि खुनाचा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणी बिट्ट्या कुचेकर आणि पंकज वाघमारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पसार झाले होते.
याचदरम्यान दोघेजण शिरुर तालुक्यातील पाबळ गावात येणार असल्याची माहिती हडपसर पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर पोलिसांनी पाबळ गावात सापळा लावला.
पोलिसांना पाहताच कुचेकर आणि वाघमारे उसाच्या फडातून पसार झाले. परंतु पोलिसांनी पाठलाग करुन दोघांना पकडले. तसेच, कोयता गँगमधील सत्यम भोसले याला पोलिसांच्या पथकाने नगर जिल्ह्यातील पाथर्डी गावातून अटक केली.
सोशल मीडियावर सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तलवार आणि कोयत्यासह रिल्स बनवणाऱ्या तिघा जणांवर शिक्रापूर पोलिसांकडून गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली. दोन जणांना कोयता आणि तलवारसह अटक करण्यात आली आहे.
पुण्यात कोयता गँगची दहशत वाढत असताना शिक्रापूर पोलिसांनी सोशल मीडियातील फेसबुक, इंस्टाग्राम याची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.