Jalgaon Student Suicide : राज्यात गेल्या काही दिवसांपासून आत्महत्येच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. त्यातच आता गेल्या दीड महिन्यात जळगाव जिल्ह्यात तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे तिघेही एकमेकांचे मित्र असून त्यांच्या आत्महत्येच्या घटनांबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. या घटनांमुळे जळगाव शहर सुन्न झाले आहे.
जळगाव शहरात गेल्या दीड महिन्याच्या अंतरात एका पाठोपाठ एक अशा वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. यातील दोन विद्यार्थी हे प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नववीच्या वर्गात शिकत होते तर तिसरा विद्यार्थी हा अभियांत्रिकीमध्ये केमिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. गेल्या दीड महिन्यात एकामागून एक आत्महत्येच्या या घटनांनी जळगाव शहरात खळबळ उडाली आहे.
हर्षल सुधाकर सोनवणे (17), वेदांत पंकज नाले (15) आणि ओम उर्फ साई पंडित चव्हाण (15) अशी या तीन आत्महत्या केलेल्या मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. हर्षल सुधाकर सोनवणे याने 21 ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली. यानंतर वेदांत नाले याने 2 नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली. तर त्याच्याच वर्गात शिकणारा आणि एकच बाकावर बसणाऱ्या ओम चव्हाण याने 25 नोव्हेंबर रोजी आत्महत्या केल्याचं समोर आले आहे.
या तिघांनीही कोणत्या तरी जाचाला कंटाळून आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याचे बोललं जात आहे. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करुन त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा. तसेच या घटनेची सीआयडी चौकशी करावी आणि आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणीही पालकांनी जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
“माझ्या मुलाला कुठलेही व्यसन नव्हते. त्याची घरात कुठलीही मागणी नव्हती. त्यामुळे तो आत्महत्या करू शकत नाही. त्याला कोणीतरी आत्महत्या प्रवृत्त केलेले आहे. याची सखोल सीआयडी चौकशी झाली पाहिजे”, अशी प्रतिक्रिया या मुलांच्या कुटुंबांकडून केली जात आहे. याप्रकरणी विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची चौकशी पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. यामागचे कारण काय याबद्दल लवकरच माहिती समोर येईल.