मुंबई : दुबईला ( DUBAI ) नोकरीकरीता जाऊन बक्कळ पैसा कमावण्याचे अनेकांचे स्वप्न असते. त्यामुळे पालक आपली आयुष्याची जमापुंजी गोळा करीत आपल्या मुलांना परदेशात नोकरीला पाठवत असतात. परंतू अशाप्रकारे परदेशात रहाण्यासाठी व्हीसा आवश्यक असून त्यासाठी प्रयत्न करताना फसगत होण्याची शक्यता असते. अशाच प्रकरणात एका एजंटचा नकली व्हीसा ( VISA ) पुरवून सर्वसामान्यांना लुबाडणारे नकली व्हीसा रॅकेट मुंबई पोलीसांनी अंधेरीतून उद्धवस्त केले आहे.
परदेशात नोकरीला पाठवून देतो असे आमीष दाखवून एका व्यक्तीला नकली कागदपत्रांआधारे दुबईत पाठवण्यात आले होते. दुबईत गेल्यावर त्याला आपली फसवणूक झाल्याचे समजले, या व्यक्तीला दिल्लीला प्रत्यार्पणाद्वारे पाठविण्यात आले होते. त्यामुळे त्या पिडीत व्यक्तीने दिलेल्या माहितीनंतर पोलीसांनी ही कारवाई केली. परदेशात नोकरीला पाठवून देतो असे आमीष दाखवून नकली व्हीसा तयार करणाऱ्या एका दुकलीला क्राईम ब्रँचने जेरबंद केले आहे.
या प्रकरणात अंधेरी पूर्व येथून दोघा जणांना अटक झाली आहे. पासपोर्ट आणि तसेच व्हीसाची कागदपत्रे तयार करण्यासाठी लागणारी सामग्री पोलिसांनी जप्त केली आहे. पोलीसांनी स्टॅंप, फेक व्हीसा, प्रिटींग मशीन, स्कॅनर, विविध देशांचे इमिग्रेशनचे स्टँप असे सर्व साहित्य जप्त केले आहे.
असे चालायचे फेक व्हीसा आणि आंतरराष्ट्रीय पासपोर्ट रॅकेट
परदेशात विशेषत: दुबईत नोकरीला जाऊ इच्छीणाऱ्यांना हे लोक हेरायचे आणि सर्व खर्च केल्यास अगदी पासपोर्ट आणि नकली व्हीसा तयार करून दुबई किंवा आखातातील देशांना पाठवायचे, दोन्ही आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून ते नवी दिल्लीत हाच घोटाळा करत होते. नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर मुंबईत येऊन पुन्ही हे रॅकेट सुरू केले. त्यांनी किती जणांना बनावट कागदपत्रे दिली याचा तपास सुरू असल्याचे मुंबई क्राईम ब्रँचचे पोलीस अधिकारी प्रशांत कदम यांनी मिडेशी बोलताना सांगितले.
या दोघा आरोपींनी आधी दिल्लीत अशाच प्रकारे परदेशात नोकरीसाठी पाठवतो असे सांगून अनेकांना नकली व्हीसा आणि इतरपत्र दिल्याचे उघडकीस आले आहे. त्यांना या गु्न्ह्यात अटकही झाली होती त्यानंतर त्या जामीन मिळाला. त्यानंतर त्यांनी मुंबई गाठत येथेही हाच धंदा सुरु केला. इम्तियाज शेख (62 ) आणि सुधीर सावंत (32 ) अशी या दोघांची नावे आहेत. त्यांना मुंबई पोलीसांच्या क्राईम ब्रँचने अंधेरी पूर्व येथून जेरबंद केले असून या दुकलीला 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.