विनय जगताप, टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी, पुणे | 17 फेब्रुवारी 2024 : पुणे आणि आजूबाजूच्या परिसरातील कोयते गॅंग नावाने कुप्रसिद्ध असलेल्या गुंडांवर पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. पुण्याच्या हवेली तालुक्यातून एका दुकलीला दोन कोयते आणि कार तसेच पाच लाख रुपयांच्या मुद्देमालासह उरुळी कांचन ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुणे शहराचे नवे पोलिस आयुक्त म्हणून अमितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर पुणे पोलिसांनी 200 गुंडाची ओळख परेड काढून गुन्हेगारी टोळ्यांना इशारा दिला होता. यानंतर आता पोलिसांनी धडक कारवाई सुरु केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोरेगाव ग्रामपंचायत हद्दीतील पुणे-सोलापूर हायवे रोड लगत हॉटेल चायनीज कट्टासमोर उभ्या असलेल्या एका लाल रंगाच्या गाडीत दोघे जण कोयते बाळगून बसले आहेत, अशी माहिती शुक्रवारी रात्री 9 च्या सुमारास पोलिसांना आपल्या गुप्त खबऱ्याकडून मिळाली. त्यानूसार पोलिसांनी सापळा रचून तेथे लाल रंगाची चारचाकी गाडीतून कोयते गॅंगच्या दोघांना शस्रास्रांसह ताब्यात घेतले.
उरुळी कांचन पोलिसांनी पुणे-सोलापूर महामार्गावरील कोरेगाव गावच्या हद्दीतील हायवे रोड लगतच्या हॉटेल चायनीज कट्टासमोरून आरोपींना ताब्यात घेतलं आहे. चंद्रशेखर दाजी चोरमुले ( वय – 29, रा. माळी मळा, लोणी काळभोर, ता. हवेली ) आणि आकाश मधुकर लांडगे ( वय -19, रा. बस स्टॉपच्या पाठीमागे, उरुळी कांचन, ता. हवेली ) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन कोयते आणि एक चारचाकी गाडी असा 5 लाख 2 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. कोयता गँगमधील गुन्हेगारांना शहर पोलिसांनी बेदम चोप दिल्याच्या घटनेनंतर आता कोयता गॅंगचे लोन ग्रामीण भागात पोहोचलं आहे. उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील आठ दिवसात ही दुसरी घटना घडली आहे.