ओढ्यात आंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू, भाऊ थोडक्यात बचावला

| Updated on: Sep 12, 2021 | 8:58 PM

सांगलीच्या जत तालुक्यातील उमदी येथे ओढ्यात आंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणीचा पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर त्यांचा लहान भाऊ थोडक्यात बचावला आहे.

ओढ्यात आंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू, भाऊ थोडक्यात बचावला
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

सांगली : सांगलीच्या जत तालुक्यातील उमदी येथे ओढ्यात आंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर त्यांचा लहान भाऊ थोडक्यात बचावला आहे. रेणुका ऐवळे (वय 7) आणि लक्ष्मी ऐवळे (वय 11) असं मृतक बहिणींचं नाव आहे. तर मायाप्पा ऐवळे (वय 6) असं बचावलेल्या भावाचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

ऐवळे कुटुंबीय हे काही दिवसांपासून उमदी गावात ओढ्यालगत असणाऱ्या आपल्या घरात राहात होते. ऐवळे कुटुंब मजुरी करुन आपला उदरनिर्वाह करतो. या दरम्यान आज सकाळी घरातील सर्व लोक दुसऱ्याच्या शेतात कामासाठी गेले होते. घरात दोन मुली आणि एक मुलगा होता.

दुपारी आंघोळ करण्यासाठी दोन्ही बहीणी आणि एक भाऊ असे तिघे मिळून वडापात्रात आंघोळी करण्यासाठी गेले. पण पाण्याचा अंदाज न आल्याने या दोन्ही सख्ख्या बहिणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर त्याचवेळी त्यांच्यासोबत पोहण्यासाठी गेलेला लहान भाऊ मायाप्पा शिवानंद ऐवळे याला पाण्यात बुडताना ओढ्यालगत जनावरे राखणारा संभाजी माने या युवकाने पाहीले. त्याने तात्काळ उडी घेत त्या चिमुकल्याचे प्राण वाचवले. या घटनेने उमदी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

गोंदियात चार युवकांचा नदीत बुडून मृत्यू

दुसरीकडे गेल्या आठवड्यात गोंदियात अशीच एक घटना समोर आली होती. गोंदिया जिल्हातील आमगाव तालुक्यातील काळीमाती या गावातील तरुण मारबत घेऊन मानेकसा जवळील बागनदी जवळ येथे गेले होते. यावेळी युवकांना अंघोळ करण्याचा मोह आवरता आला नाही. नदी पात्रात सात तरुण उतरले असता खोल पात्रात जाऊन त्यापैकी चार युवकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सुमित शेंडे 16 वर्ष ,रोहित बहेकार 16 वर्ष ,संतोष बहेकार 16 वर्ष , प्रणय खोब्रागडे 19 वर्ष यांचा समावेश आहे. चारही युवक वर्ग 11 वीमध्ये शिक्षण घेत होते.

रायगडमध्ये बीचवर फिरायला गेलेल्या तरुणाचा मृत्यू

तर दुकरीकडे रायगड येथील मुरूड येथे काशिद बीचवर मित्रांसोबत फिरायला आलेल्या आणखी एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. गौरव सिंग यादव असे तरुणाचे नाव असून तो मूळचा उत्तरप्रदेशमधील सुलतानपूर येथील रहिवासी आहे. तो सध्या खोपोली येथे कामासाठी आला होता. मित्रांबरोबर काशिद बीचवर फिरायला आलेला असताना हा तरुण समुद्राच्या पाण्यात पोहत होता. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.

नागपुरच्या कन्हान नदीत पाच तरुण बुडाले

दरम्यान, नागपूर जिल्ह्यातही अशीच काहिशी घटना समोर आली आहे. कन्हान नदीत पोहायला गेलेले पाच युवक बुडाल्याची घटना नागपूरमध्ये समोर आली आहे. कामठी येथील अम्माचा दर्गा येथे सुरु असलेल्या ‘उर्स’मध्ये सहभागी होण्यासाठी यवतमाळहून एकूण दहा तरुण आले होते. दहा जणांपैकी पाच तरुणांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बुडालेल्या युवकांचा शोध घेण्याचे प्रयत्न कन्हान नदीपात्रात सुरु आहेत.

यवतमाळहून दहा मित्रांचा ग्रुप नागपूरला आला होता. हे तरुण 19 ते 21 वर्ष वयोगटातील होते. कामठी येथील अम्माचा दर्गा येथे सुरु असलेल्या ‘उर्स’मध्ये सहभागी होण्यासाठी ते आले होते. यावेळी कन्हान नदीपात्रात उचलून पोहण्याचा मोह काही जणांना झाला. मात्र पोहायला गेलेल्या पाच युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जात आहे. सगळे युवक यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसचे असल्याची माहिती आहे.

हेही वाचा :

VIDEO : सूनेची सासूला मारहाण, कॅमेऱ्यासमोर कानशिलात, घरातला कलह सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई एपीएमसीत नाल्यामध्ये निळ्या प्लास्टिकच्या पिशवीत मृतदेहाचे तुकडे, परिसरात एकच खळबळ

नेमकं असं काय घडलं ज्याने बँक ऑफ बडोद्याच्या महिला मॅनेजरला गळफास घ्यावा लागला, पतीला बेड्या, हत्या की आत्महत्या?