महाराष्ट्रात महिला आणि मुलींच्या सुरक्षेवर कितीवेळा प्रश्न उपस्थित करायचा? असा देखील प्रश्न उपस्थित होतोय. महाराष्ट्रात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न वारंवार ऐरणीवर येत आहे. विशेष म्हणजे शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना आज समोर आली आहे. याआधीदेखील तशा घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी बदलापुरातील शाळेतील घटनेनं राज्य हादरलं होतं. तसेच नाशिकमध्ये एका निवृत्त मुख्याध्यापकाकडून सरकारी कार्यालयात महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला गेल्याची घटना समोर आली. यानंतर आता चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात असाच संतापजनक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे वरारो शहर हादरलं आहे. या घनेच्या निषेधार्थ उद्या वरोरा शहर बंदची हाक देण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात 2 शिक्षकांनी 17 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित विद्यार्थिनी इयत्ता अकरावीत शिक्षण घेत आहे. प्रमोद बेलेकर आणि धनंजय पारखे अशी आरोपी शिक्षकांची नावं आहेत. आपल्या वाढदिवसाचं निमित्त करून या विद्यार्थिनीला शिक्षकांनी आपल्या रूमवर बोलावलं होतं. वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून या आरोपी शिक्षकांनी तिच्याकडे मिठीची मागणी केली. तिने घाबरून पळ काढण्याचा प्रयत्न करतात बळजबरी करण्यात आली.
भीतीने पळून आलेल्या पीडित मुलीने पालकांना याची माहिती दिली. यानंतर पीडितेच्या पोलिसांनी वरोरा पोलीस ठाणे गाठत तक्रार केली. वरोरा पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी आरोपी शिक्षकांच्या विरोधात पॉक्सो आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आपल्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोपी दोन्ही शिक्षक फरार झाले आहेत.
वरोरा शहरातील विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष या घटनेनंतर आक्रमक झाले आहेत. त्यांनी शिक्षकांच्या निलंबनाची मागणी केली आहे. मनसे, भाजप, बजरंग दल या पक्ष आणि संघटनांनी या घटनेविरोधात आंदोलन करून आरोपी शिक्षकांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. याच प्रकरणावरुन 31 ऑगस्टला वरोरा बंदची हाक देण्यात आली आहे.