मुंबई : मोतीलाल नगर परिसरात क्लासेससाठी जाणाऱ्या विद्यार्थिनीच्या (student) गळ्यातील चेन हिसकावून पळून गेलेल्या दोन चोरट्यांना मुंबईतील गोरेगाव पोलिसांनी (mumbai police) अटक केली आहे. गोरेगाव पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला गोरेगाव परिसरातून अटक केली. अटक करण्यात आलेला आरोपी हा गोरेगावचा (goregoan) रहिवासी असून त्याच्यावर मालाड, दहिसर, बांगूर नगर आणि इतर अनेक पोलीस ठाण्यात घरफोडी आणि लुटीचे डझनभर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी जाहीर केली आहे.
पोलिसांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे, 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास एक विद्यार्थिनी खाजगी क्लासला जात होती. त्यावेळी दोन मुलांनी तेथे येऊन विद्यार्थिनीचा पाठलाग केला. त्यानंतर निर्जनस्थळी गेल्यानंतर तिच्या गळ्यातील 8 ग्रॅम सोन्याची चेन जबरदस्तीने खेचून पळ काढला. विद्यार्थिनीने विरोध केला, मात्र दोन्ही दरोडेखोर विद्यार्थिनीला ढकलून पळून गेले.
घटनेनंतर घाबरलेल्या विद्यार्थिनीने घटनेची संपूर्ण माहिती तिच्या आईला सांगितली. आईने थेट गोरेगाव पोलिस स्टेशन गाठले अन् दोघांच्या विरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी घटनास्थळी दुचाकीवरून विद्यार्थिनीचा पाठलाग करताना दिसत आहेत. आरोपीची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्याला 23 फेब्रुवारीच्या रात्री गोरेगाव परिसरातून अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, आरोपीला २७ फेब्रुवारीपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
जनेंद्र नरसिंगराव कोया उर्फ जानी असे पहिल्या अटक आरोपीचे नाव असून ऋषिकेश प्रकाश दळवी उर्फ बाबू काल्या असे दुसऱ्या आरोपीचे नाव आहे.