कल्याण / 25 जुलै 2023 : कल्याणमध्ये चोरांचा सुळसुळाट झाला आहे. यात महिला चोरांची पण कमी नाही. एक घटना कल्याण पश्चिमेतील नारायण वाडीत उघडकीस आली. सोनाऱ्याच्या दुकानात दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने दोन महिला दुकानात आल्या. त्यांनी दुकानदाराला बोलण्यात गुंतवत हातचलाखी करत सोन्याच्या अंगठीच्या जागी नकली अंगठी ठेवून बॉक्समधील 4.800 ग्रॅम वजनाची लेडीज अंगठी लंपास केली. महिलांची ही चोरी सीसीटीव्हीत कैद झाली असून, या प्रकरणी कल्याण महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला आहे. मात्र या घटनेनंतर व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण आहे.
कल्याण पश्चिमेकडील स्टेशन रोडला असलेल्या नारायण वाडीत एम.एम. शंखलेशा ज्वेलर्स आहे. रविवारी सायंकाळी 5 च्या सुमारास या दुकानात दोन महिला खरेदीच्या बहाण्याने आल्या. या महिलांनी दुकानदाराला अंगठी दाखवण्यास सांगितली. अंगठी बघण्याच्या बहाण्याने दुकानदाराला बोलण्यात गुंतवून महिलांनी सोन्याची अंगठी चोरली. त्या जागी नकली अंगठी ठेवली. यानंतर खरेदी न करता त्या दुकानातून निघून गेल्या. हा सर्व प्रकार दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
काही वेळाने दुकानातील कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी आसपासच्या परिसरात महिलांचा शोध घेतला. मात्र त्या कुठेही आढळून आल्या नाहीत. अखेर दुकान मालकिणीने महात्मा फुले पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपी महिलांचा शोध घेत आहेत.