नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सोशल मीडियाच्या प्रेमात पडलेल्या दोन तरुणांना भरधाव रेल्वेच्या धडकेत प्राण गमवावा लागला. हे दोन्ही तरुण पूर्व दिल्ली परिसरात रेल्वे रुळाच्या परिसरात व्हिडिओ बनवत होते. यावेळी मागून आलेल्या ट्रेनने धडक दिल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला. वंश शर्मा (23) आणि मोनू (20) अशी मृत तरुणांची नावे आहेत. हे दोघे तरूण पूर्व दिल्लीच्या कांती नगर एक्सटेंशन परिसरातील रहिवासी होते. यातील वंश हा बी.टेक.च्या तृतीय वर्षात शिकत होता तर मोनू एका दुकानामध्ये सेल्समनचे काम करायचा. बुधवारी घडलेल्या या घटनेने सोशल मीडियाचा अतिवापर किती घातक ठरू शकतो, याचा प्रत्यय आला आहे.
अनेक तरुण मंडळी रेल्वे रुळावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतात. या अपघाताने रेल्वे रुळाच्या परिसरात व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. रेल्वे प्रशासनाने कठोर पावले उचलून रेल्वे परिसरात कुणीही व्हिडिओ वा सेल्फी काढण्यासाठी फिरकणार नाही याची खबरदारी घेण्याची मागणी जोर धरत आहे.
रेल्वे अपघातात मृत्यू झालेले दोन्ही तरुण यापूर्वीही रेल्वे ट्रॅकवर लाईव्ह व्हिडिओ बनवण्यासाठी अनेकदा गेले होते. दोघांना सोशल मीडियामध्ये व्हिडिओ पोस्ट करण्याचे प्रचंड वेड होते. विविध प्रकारचे थरारक व्हिडिओ बनवून लोकप्रिय बनण्याचा दोघांचा इरादा होता. त्यांना या माध्यमातून पुरेसे पैसे कमवायचे होते. त्यांनी मोबाईलच्या आधारे शॉर्ट फिल्मचे शूटिंग सुरू केले होते. रेल्वे ट्रॅकवरील व्हिडिओज मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय बनतात, याचा विचार करून त्यांनी आपले लक्ष रेल्वे ट्रॅककडे केंद्रित केले होते.
रेल्वे ट्रॅकवरील शूटिंगचा हा छंद आपला जीव घेईल याची भीती त्यांना नव्हती. मात्र काळाने दोघांवर अचानक घाला केल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. रेल्वे रुळावर दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याचे दिल्ली पोलिसांना समजले. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी दोन्ही मृतदेह जीटीबी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले.