निनाद करमरकर, उल्हासनगर : 500 रुपये सुट्टे दिले नाही, म्हणून एका दुकानात (Shopkeeper) घुसून दुकानदाराला बेदम मारहाण केल्याची घटना उल्हासनगर (Ulhasnagar)शहरात घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ज्यावेळी हा सगळा प्रकार पोलिसांच्याकडे आला त्यावेळी पोलिसांनी तिथला सीसीटिव्हीची पाहणी केली. हा प्रकार सगळीकडे व्हिडीओच्या माध्यमातून व्हायरल झाला आहे. त्यामुळे संतप्त झालेले नागरिक अजून किती दिवस हे सगळं सहन करायचं असा प्रश्न विचारत आहेत. पोलिस (Police) त्या तरुणांचा शोध घेत आहेत. त्याचबरोबर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असंही सांगण्यात आलं आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प 2 मधील खेमाणी चौकात न्यू प्रियंका मोबाईल नावाचं दुकान आहे. याठिकाणी दोन तरुण 500 रुपये सुट्टे मागण्यासाठी आले. मात्र दुकानदाराने सुट्टे पैसे देण्यास नकार दिला. याचा राग येऊन या हुल्लडबाज तरुणांनी थेट या दुकानदाराला मारहाण करायला सुरुवात केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, किरकोळ कारणावरून व्यापाऱ्यांना दिवसाढवळ्या दुकानात घुसून मारहाण होत असेल तर अशा गुन्हेगारांना कायद्याचा धाक तरी उरलाय का? असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे.
डोंबिवली, कल्याण,उल्हासनगर या परिसरात मागच्या कित्येक दिवसांपासून गुन्हेगारीचं प्रमाण अधिक वाढलं आहे. अनेकदा आरोपींना शिक्षा होऊन अशा पद्धतीचं कृत्य घडत असल्यामुळे पोलिसांसह नागरिक सुध्दा चिंता व्यक्त करीत आहेत. कालचा भयानक प्रकार शहरात सगळीकडे व्हायरल झाला आहे. असल्या प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलिसांची भूमिका महत्त्वाची असल्याचं नागरिक म्हणत आहेत.