उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये चालत्या गाडीवर अंघोळ करतानाचा इन्स्टा रील्स व्हिडीओ तयार करणाऱ्या तरुणानं अखेर माफी मागतानाचा व्हिडिओ प्रसारित केला आहे. मध्यवर्ती पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांसोबत मध्यवर्ती पोलीस ठाण्याबाहेर उभं राहून त्याने हा व्हिडीओ चित्रित केला आहे. चालत्या गाडीवर अंघोळ करतानाचा व्हिडिओ 16 मे रोजी सोशल मीडियात व्हायरल झाला होता. व्हिडिओत कधी सीटवर बर्फ ठेवला, तर कधी गाडीसोबत स्वतःलाही धुतलं! वाढत्या गर्मीवर उपाय सांगणारे तरुणाचे इन्स्टा रील्स व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 18 मे रोजी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
उल्हासनगरमध्ये काही दिवसांपूर्वी आदर्श शुक्ला या रील्स स्टारने भररस्त्यात चालत्या गाडीवर अंघोळ करतानाचा व्हिडिओ चित्रित केला होता. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर रील्सच्या स्वरूपात टाकण्यात आल्यानंतर तो चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओची माध्यमांनीही दखल घेतल्यानंतर पोलिसांनी आदर्श शुक्ला आणि त्याच्यामागे बसलेल्या तरुणीविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा फक्त दंडनीय असला, तरी त्यातून इतरांनी असं कृत्य न करण्यासाठी पोलिसांनी आदर्श याच्याकडून एका व्हिडिओतूनच माफीनामा तयार करून घेतला आहे.
या व्हिडिओत माझा इतरांना इजा पोहोचेल असा हेतू नव्हता, तर मी फक्त करमणूक म्हणून हा व्हिडिओ चित्रित केला होता. मात्र हेल्मेट न घालता गाडी चालवणं, हात सोडून गाडी चालवणं आणि रस्त्यावर पाणी सांडून इतरांना इजा होईल, असं कृत्य माझ्याकडून घडलं. त्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो. मला पोलिसांनी चांगलं सहकार्य केलं, असं आदर्श शुक्ला हा या व्हिडिओत म्हणताना दिसतोय. मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे बाहेरच चित्रित करण्यात आलेल्या या व्हिडिओत त्याच्यासोबत मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे एक अधिकारीही उभे असलेले पाहायला मिळतायत.
या तरुणाने जरी करमणूक म्हणून व्हिडिओ चित्रित केला असला, तरी त्याने नियम मोडले आहेत. त्याचा व्हिडिओ पाहून उद्या आणखी काही लोकांनी असे व्हिडिओ तयार करू नयेत, ज्यामुळे इतर कुणाला इजा होऊ नये, यासाठी आपण हा व्हिडिओ चित्रित करून घेतल्याचं यानंतर मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी सांगितलं.