Thane Crime : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरूणावर जीवघेणा हल्ला

| Updated on: Oct 17, 2023 | 3:54 PM

दारू पिण्यासाठी पैसे मागितले पण ते न मिळाल्याचा राग मनात ठेऊन एका तरूणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक करत न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

Thane Crime : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरूणावर जीवघेणा हल्ला
Follow us on

उल्हासनगर | 17 ऑक्टोबर 2023 : दारू पिणं (alcohol) हे शरीरासाठी, आरोग्यासाठी आणि एकंदर आयुष्यासाठी हानिकारक असते. हे सर्वांनाच माहीत असले तरी बरेच जण दारूचे सेवन करतात. त्यामुळे त्यांच्या शरीराला तर त्रास होतोच. मात्र त्या व्यसनाने इतरांनाही त्रास होऊ शकतो. दारूच्या नशेमुळे अनेकांची आयुष्यं, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले.

दारूचे व्यसन लागलेल्या व्यक्तीला ती मिळाली नाही तर अजून त्रास होतो. आणि त्या भरात तो काहीही करू शकतो. अशीच एक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एका व्यक्तीने तरूणावर जीवघेणा हल्ला (attack on man) केल्याचा खळबळजनक प्रकार उल्हासनगर (Ulhasnagar city) कॅम्प 1 बिर्ला गेट जवळ घडला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. पोलिसांनी आरोपीला अटक करत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय झालं ?

15 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी हा प्रकार घडला. त्या दिवशी उल्हासनगर १ परिसरात राहणारा कुणाला सिंह चव्हाण हा तरूण उल्हासनगर कॅम्प 1, बिर्ला गेट जवळ ताक पिण्यासाठी गेला होता. त्याचवेळी आरोपी, रमेश तलवार हा तिथे आला आणि दारू पिण्यासाठी त्याने कुणाल चव्हाण याच्याकडे पैसे मागितले. मात्र कुणालने त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्याच मुद्यावरू आरोपी रमेश हा कुणालशी वाद घालू लागला. त्यांचं भांडण चांगलंच पेटलं.

थोड्यावेळाने कुणाल हा त्याच्या घरी परत जाण्यासाठी निघाला. मात्र आरोपी रमेश हा रागाने धुमसत होता. त्याच संतापाच्या भरात त्याने घरी निघालेल्या कुणालवर मागून हल्ला केला आणि त्याच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात कुणाल गंभीर जखमी झाला असून इतर नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत त्याला उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयात दाख केले. दरम्यान हल्ल्याची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी रमेश याला अटक करत त्याला न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे हे या घटनेचा अधिक तपास करत आहेत.