Ulhasnagar Crime : गेल्या काही दिवसांपासून लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना काही महिन्यांपूर्वी घडलीय. या घटनेनंतर सर्वत्र संतपाची लाट उसळली होती. या घटनेतील प्रमुख आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला. या घटनेनंतर आता उल्हासनगरात एक धक्कादायक घटना घडली आहे. उल्हासनगरात एका 3 वर्षीय चिमुरडीवर 18 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
उल्हासनगरात एका इमारतीच्या नेपाळी वॉचमनच्या 3 वर्षीय चिमुकलीवर एका 18 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही तासात या नराधमाला बेड्या ठोकल्या. सध्या त्याला न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका इमारतीत एक नेपाळी व्यक्ती वॉचमन म्हणून काम करतो. इमारतीच्याच आवारात एका खोलीत तो कुटुंबासह वास्तव्याला आहे. शनिवारी २ नोव्हेंबर रोजी हा नेपाळी वॉचमन इमारतीची साफसफाई करत असताना एका रहिवाशाने वॉचमनच्या खोलीतून त्याच्या लहान मुलींचा रडण्याचा आवाज ऐकला. यानंतर त्याने या खोलीत जाऊन पाहिलं असता, एक युवक तिथून पळताना त्याला दिसला.
त्या रहिवाशाने याबद्दलची माहिती वॉचमनला दिली. यानंतर वॉचमन आणि त्याच्या पत्नीने घरी धाव घेत मुलीची विचारपूस केली. त्यावेळी तिच्यावर अत्याचार झाल्याचं त्यांना आढळलं. यानंतर त्यांनी चिमुकलीला घेऊन शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात जाऊन तपासणी केली. त्यावेळी तिच्यावर बलात्कार झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे मध्यवर्ती पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत तातडीने तपासाला सुरुवात केली.
यानंतर अवघ्या २ तासात पोलिसांनी १८ वर्षीय नराधमाला बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली. बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेनंतर उल्हासनगरात घडलेल्या या घटनेमुळे शहर हादरून गेलं आहे.