अमरावती: अमरावतीच्या उमेश कोल्हे(Umesh Kolhe) हत्याप्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. उदयपूरमध्ये (Udaipur) कन्हैयालालची(Kanhaiyalal ) हत्या होण्याच्या आठवडाभर आधीच उमेश कोल्हीची हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, उमेशचे हत्या प्रकरण इतक्या उशीरा का समोर आले. कारवाईस इतका विलंब का झाला? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.
अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचे कनेक्शन थेट नुपूर शर्मा प्रकरणाशी जोडण्यात येत आहे. नुपूर शर्मा प्रकरणीच उदयपूरमध्ये कन्हैयालाल नावाच्या टेलरची हत्या झाली होती. उदयपूरमध्ये कन्हैयालालची हत्या होण्याच्या आठवडाभर आधीच उमेश कोल्हेची हत्या झाल्याचा दावा केला जात आहे. हत्येनंतर काही वेळातच दोन तरुणांनी एक व्हिडिओ जारी केला आणि धारदार शस्त्रे दाखवून हत्येची जबाबदारी स्वीकारली. यानंतर पोलिसांनी यांना अटक केली.
शहरातील सर्वात गजबजलेल्या मालदास स्ट्रीट येथे ही घटना घडली. मयत युवक कन्हैयालाल टेलर त्याच्या टेलरिंगच्या दुकानात होता. यावेळी दोन तरुण धारदार शस्त्रे घेऊन आले आणि त्यांनी कन्हैयालाल यांच्यावर हल्ला केला. यावेळी आजूबाजूचे लोक कन्हैयालालच्या बचावासाठी येण्याआधीच आरोपी पळून गेले. याबाबत घंटाघर पोलिसांना महिती देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल होताच व्यापाऱ्यांनी विरोध केला. एवढेच नाही तर दुकान तात्काळ बंद करण्यात आली. सायंकाळपर्यंत मालदास रस्त्यावर मोठा जमाव जमला आणि पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून देशभरात वाद सुरू आहे. मयत कन्हैयालालने नुपूर शर्माच्या बाजूने पोस्ट टाकली होती. तेव्हापासून त्याला धमक्या येत होत्या. जबाबदारी घेत व्हिडीओ जारी करणाऱ्या दोन तरुणांनी नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचाही हवाला दिला होता. या घटनेनंतर एकामागून एक असे तीन व्हिडिओ त्यांवनी जारी केले होते. यामध्ये घटनेच्या 15 दिवस आधी पहिला व्हिडीओ बनवण्यात आला होता, ज्यामध्ये तरुणाची हत्या करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते. दुसरा व्हिडिओ या हत्येचा लाईव्ह होता, ज्यामध्ये तरुणाची धारदार शस्त्राने हत्या कशी करण्यात आली हे स्पष्ट दिसले. तर तिसऱ्या व्हिडीओमध्ये व्हिडीओमध्ये दोन तरुणांनी हत्येची जबाबदारी स्विकारली.
टेलरची हत्या केल्यानंतर उदयपूरच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातले पोलीसही सतर्क झालेले होते. राजसमंद पोलिसांनी दोघांनाही पकडण्यासाठी भीम-देवगढ परिसरात यंत्रणा उभी केली होती. आधीच नाकाबंदी करण्यात आलेली. दोघाही मारेकऱ्यांचं लोकेशन पोलिसांनी ट्रेस केलेलं होतं. बाईकवरून या दोघांनी टेलरची हत्या करुन पळ काढला होता.
नॅशनल हायवे 8 वर भीम इथं असलेल्या डाकबंगल्याच्या ठिकाणी पोलिसांना नाकाबंदी केली गेली. पोलिसांना बघात दोघंही आधीच सतर्क झाले. बाईकवर असलेल्या मारेकऱ्यांनी पळ काढण्यास सुरुवात केली. बदनौर येथील चौकातून कॉलेजच्या समोरुन जात हायवेवर आले. तिथून ते पुढे अजमेरच्या दिशेने निघाले होते. यावेळी भीम-देवगढ पोलिसांनी थरारक पाठलाग करत मारेकऱ्यांना बाईकवर संध्याकाळी साडे सहा वाजता गाठलं आणि त्यांच्या मुसक्या आवळल्या.
54 वर्षीय उमेश कोल्हे यांच्या हत्येमुळे अमरावतीत एकच खळबळ उडाली. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने त्याची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. मात्र, हा अंदाज खरा ठरला असून नुपूर शर्मा प्रकरणामुळेच कोलेहे यांची हत्या झाल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे.
कोल्हे यांचं स्वत:चं मेडिकल स्टोर आहे. 21 जून 2022 ला कोल्हे रात्री उशीरा आपल्या मेडिकलमधून घरी जात असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. घरी परतत असताना या हल्लेखोरांनी त्यांना रस्त्यातच गाठलं आणि त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात ते ठार झाले.
या प्रकरणी आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी अजूनही बेपत्ता आहे. उमेश कोल्हे यांचा मुलगा संकेत कोल्हे याने अमरावतीतील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुदस्सीर अहमद आणि 25 वर्षीय शाहरुख पठाण या दोघांना 23 जून रोजी अटक करण्यात आली. अब्दुल तौफिक (24), शोएब खान (22) आणि अतिब रशीद (22) या तिघांना 25 जून रोजी अटक करण्यात आली होती. तर मुख्य आरोपी शमीम अहमद फिरोज अहमद हा अद्याप फरार आहे. कोल्हे यांनी नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडिया पोस्ट व्हॉट्सअॅपवर शेअर आणि फॉरवर्ड केली होती. हा मेसेज त्याने मुस्लिम लोक असलेल्या ग्रुपवरही केला. त्यामुळे या लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याने ही हत्या झाल्याचा संशय आहे.