सांगली : सांगली (Sangli) जिल्ह्यातील कवठेमहांकाळ (kavathe mahankal) तालुक्यातील करोली टी (karoli ti) या गावात धुणे धुण्यास गेल्यानंतर पाय घसरून बंडगरवाडी तलावात पडल्यामुळे राजेंद्र अण्णाप्पा चव्हाण वय (48) आणि कार्तिक राजेंद्र चव्हाण वय (18) या बाप-लेकांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली आहे. कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा या घटनेची नोंद झाली आहे. काल झालेल्या या दुर्देवी घटनेमुळे गावकरी पुर्णपणे हादरुन गेले आहेत.
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील करोली टी येथील राजेंद्र अण्णाप्पा चव्हाण आणि कार्तिक राजेंद्र चव्हाण हे घरातील धुणे धुण्यासाठी बंडगरवाडी तलाव परिसरात गेले होते. यावेळी ते पाय घसरुन पडले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. काल सायंकाळी सहाच्या सुमारास तलावाच्या लगत स्थानिकांनी त्यांचे धुणे दिसले, त्यामुळे काही लोकांना संशय आला त्यानंतर त्यांनी पाहणी केली असता. तलावात त्या दोघांचेही मृतदेह सापडले.
या दुर्घटनेची माहिती पोलिसांना तात्काळ देण्यात आली. रात्री दहाच्या सुमारास त्यांचे मृतदेह हे शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहेत. पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. दरम्यान, बाप-लेकांचा मृत्यू नेमका कसा झाला? याबाबत आता काही सांगता येत नाही, अशी माहिती पोलिस निरीक्षक जोतीराम पाटील यांनी दिली आहे. मात्र, या बापलेकाच्या अशा अचानक निधनाने संपूर्ण गावातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.