लखनऊ : लहान मुलं देवाघरची फुलं असं आपण मानतो. लहान मुलं घरात असले की घरात खूप हसतंखेळतं वातावरण असतं. त्यांचं आपल्या आयुष्यात असणं खूप काही मानसिक समाधान देणारं असतं. पण याबाबतची जाणीव काही लोकांमध्ये नसते. त्यामुळे ते लहान मुलांचा विचार करत नाहीत. त्यांच्या मनाचा विचार आणि जीवाची पर्वा करत नाहीत. उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्ह्यात अशीच एक घटना घडली आहे. एका महिलेने अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्याची हत्या केलीय. या हत्येमागील कारण अतिशय शुल्लक होतं. पण तिने रागाच्या भरात चिमुकल्याचा जीव घेतला. तिच्या या कृत्याची शिक्षा तिला मिळेलच, कारण पोलिसांनी तिला जायबंद केलंय. पण तिच्या या विकृत आणि संतापजनक कृत्यामुळे संपूर्ण हरदोई जिल्हा हादरला आहे.
संबंधित घटना ही हरदोई जिल्ह्यातील माधौगंज पोलीस ठाणे हद्दीत घडली. चार वर्षाचा राजू (बदलेलं नाव) 14 ऑक्टोबरला संध्याकाळी घराबाहेर खेळत असताना अचानक गायब झाला होता. त्याच्या कुटुंबियांनी त्याला शोधण्याचे अतोनात प्रयत्न केले होते. पण तरीही तो सापडला नाही. सलग चार दिवस त्याचा शोध सुरु होता. अखेर 18 ऑक्टोबरला घरामागे राजूचा मृतदेह आढळला आणि मोठी खळबळ उडाली. चार वर्षाच्या चिमुकल्याची नेमकी हत्या कुणी केली असावी? त्या निष्पाप जीवाची काय चूक असेल? असे प्रश्न राजूच्या कुटुंबियांना आणि परिसरातील नागरिकांना सतावत होते. अखेर या प्रकरणी मृतकाची हत्या करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे. विशेष म्हणजे एका महिलेने चार वर्षाच्या चिमुकल्याची हत्या केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजू त्याच्या इतर जोडीदारांसोबत घराबाहेर खेळत होता. या दरम्यान त्यांचं आपापसात भांडण झालं. लहान मुलांमधील हा वाद घरच्यांपर्यंत पोहोचला. राजूच्या काकांनी आरोपी महिलेच्या मुलाचा हात पिरगळला. त्यामुळे तो मुलगा रडत आपल्या आईकडे गेला. त्याच्या आईला या गोष्टीचा राग आला. त्यातून तिच्या मनात सूडभावना जागृत झाली. तिने राजूला घरात बोलावलं. त्यानंतर त्याचा हात पकडत भिंतीवर आदळलं. महिलेच्या या कृत्यामुळे राजूच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
महिलेचा क्रूरपणा इथेच थांबला नाही. तिने राजूच्या तोंडात भूसा कोंबला. त्यानंतर त्याला पोत्यात टाकून घरातील दुसऱ्या खोलीत डांबलं. संबंधित घटनेबाबत आरोपी महिलेने घरातील कुणालाच काही सांगितलं नाही. या दरम्यान राजूच्या शोधासाठी पोलिसांसह डॉग स्कॉड घराबाहेर आलेला होता. पोलिसांकडून सुरु असलेली शोध मोहीम पाहून आरोपी महिला घाबरली. तिने राजूचा मृतदेह घराबाहेर गवतामध्ये लपवला आणि ज्या गोणीत त्याला ठेवलं होतं ती प्लास्टिकची गोणी घरात ठेवली. इथेच ती फसली. पोलिसांनी तपास केला असता डॉग स्कॉडकडून महिलेच्या घराकडे जाण्याचे संकेत दिले जात होते. त्यामुळे पोलिसांनी आरोपी महिलेची कसून चौकशी केली असता आरोपी महिलेने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. दरम्यान, आरोपी महिलेला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जिल्ह्याभरातून केली जात आहे.