वॉशिंग्टन : आईने एक्स-नवऱ्याचा खून केला. त्यामुळे लेकरांचा बाप देवाघरी गेला, तर आई तुरुंगात. त्यानंतर ही पाच मुलं उघड्यावर पडली. अशावेळी या हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यातील ‘आई’ जागी झाली. अमेरिकेतील (United States) पोलिस अधिकारी निकोलस क्विंटाना (Nicholas Quintana) यांनी पाचही मुलांना दत्तक घेतले. मुलांच्या वडिलांना त्यांच्या आईनेच गोळ्या घालून ठार (Murder) मारले होते. पोलिस कर्मचाऱ्याच्या या हृदयस्पर्शी वर्तनावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. पोलिस दलातील मानवतेच्या जिवंतपणाचे लक्षण म्हणून अनेक जण याकडे पाहत आहेत. द मिरर वेबसाईटने यासंदर्भात बातमी दिली आहे.
लास वेगासमध्ये राहणारी 40 वर्षीय एमिली एज्रा या महिलेने तिचा घटस्फोटित पती पॉल याची गोळ्या घालून हत्या केली होती. दोघांमध्ये काही कारणावरुन वादावादी झाली. त्यानंतर संतापाच्या भरात महिलेने पहिल्या नवऱ्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे. 14 जानेवारी 2022 रोजी ही घटना उघडकीस आली.
पोलीस अधिकारी निकोलस जेवायला बसत असताना एका खुनाच्या प्रकरणाबाबत त्यांना फोन आला. माहिती मिळताच ते त्यांच्या टीमसह घटनास्थळी पोहोचले. तिथे त्यांना एक भयानक दृश्य दिसलं. पाच मुले एका कोपऱ्यात घाबरुन बसली होती. त्यांच्या वडिलांना त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या आईने गोळ्या घालून ठार मारलं होतं.
आरोपी महिलेला ताब्यात घेतल्यानंतर, निकोलस त्यांच्या घरी परतले, परंतु त्या मुलांचा विचार ते मागे सोडू शकले नाहीत. या प्रकरणावर पत्नीशी दीर्घ काळ चर्चा केल्यानंतर, निकोलस यांनी पाचही मुलं दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणाच्या तपासात इतरही पोलीस अधिकारी होते, मात्र निकोलस यांना मुलांविषयीचा अधिक कळवळा जाणवत होता. मुलांच्या डोक्यावरचं पितृछत्र काळाने हिरावलं, तर मातृछत्र महिलेच्या कर्मामुळे हरपलं. मात्र पोलिसाच्या रुपाने त्यांना हक्काचं घर मिळालं आहे.
संबंधित बातम्या :
पतीपासून विभक्त मुलगी गरोदर, आईचा संताप, 30 वर्षीय लेकीची सुपारी देऊन हत्या
एकतर्फी प्रेमातून अकरावीच्या विद्यार्थिनीची हत्या, ट्यूशनहून परतताना भररस्त्यात खून
महिला हेड कॉन्स्टेबलसह पती राहत्या घरी मृतावस्थेत, शाळेतून घरी परतलेल्या मुलासमोर भयंकर दृश्य