लखनौ : उत्तर प्रदेशातील इटावामध्ये भरधाव वेगाने जाणारी कार ट्रॅक्टरला धडकून (Uttar Pradesh Accident News) उलटली. या भीषण अपघातात कारमधील तीन मित्रांचा जागीच (Three Friends Death) मृत्यू झाला. तर चौथा मित्र हॉस्पिटलमध्ये जीवनमृत्यूशी झुंज देत आहे. त्याची प्रकृती अजूनही गंभीर आहे. हे चौघे मित्र आपल्या एका मित्राच्या बहिणीच्या तिलकोत्सवाच्या कार्यक्रमासाठी मैनपुरी येथे गेले होते. तिथून परत येत असताना हा अपघात झाला.
ही घटना मैनपुरी जिल्ह्यातील करहल भागातील आहे. कार्यक्रम आटोपून चार मित्र वॅगनआर कारमधून आपल्या घरी परतत होते. त्यावेळी वाटेत त्यांची कार ट्रॅक्टरला धडकली. मिळालेल्या माहितीनुसार, वाहनाचा वेग खूप जास्त असल्यामुळे ट्रॅक्टरला धडकल्यानंतर त्यांची कार पलटी झाली.
कारमधून प्रवास करणारे 18 वर्षीय धीरज, 20 वर्षीय अंकित आणि 22 वर्षीय तेजपाल यांचा जागीच मृत्यू झाला. तर 17 वर्षीय नीरज गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने सैफई येथील पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती अजूनही गंभीर आहे.
त्याच वेळी अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिघांचे मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवले आहेत. गावातील तिन्ही मित्रांच्या मृत्यूने संपूर्ण सराय दयानत गावात शोककळा पसरली आहे. लेकरं गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबांची रडून रडून दुरवस्था झाली आहे.
मृतांपैकी 22 वर्षीय तेजपालचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याला अडीच वर्षांचा मुलगाही असून तो शटरिंगचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. दुसरा मित्र धीरज हा इंटरमिजिएट परीक्षा पास झाला होता. तो तिघा भावांमध्ये सर्वात धाकटा होता.
तिसरा मित्र अंकित पॉलिटेक्निकचे शिक्षण घेत होता, तो त्याच्या दोन भाऊ आणि दोन बहिणींमध्ये सर्वात मोठा होता. त्याचे वडील मजुरीचे काम करतात. पालकांना आपल्या मुलाला इंजिनिअर बनवायचे होते, परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळे होते. गावातील तीन मित्रांचे मृतदेह पाहून सर्वांचे डोळे पाणावले