उत्तर प्रदेशातील सौरभ हत्याकांडामुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. या प्रकरणी सौरभची बायको मुस्कान आणि तिचा बॉयफ्रेंड साहिल यांना अटक करण्यात आली आहे. साहिलची हत्या केल्यानंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. त्यानंतर त्याचा मृतदेह एका निळ्या ड्रममध्ये टाकला आणि वरून सिमेंट लावून तो ड्रम बंद करण्यात आला होता. नंतर हा ड्रम कापून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पण मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी निळ्या ड्रमचा वापर करण्यात आल्याची बातमी देशभर पसरली आहे. मेरठमध्ये तर या निळ्या ड्रमची एवढी दहशत निर्माण झालीय की लोकांनी ड्रम खरेदी करणच बंद केलं आहे. त्यामुळे ड्रम विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
मुस्कान आणि साहिलने हा निळा ड्रम मेरठच्या जली कोठी परिसरातून खरेदी केला होता. हे निळ्या ड्रमचं मार्केट आहे. पण हत्येची बातमी आल्यापासून ड्रमची विक्री थांबली आहे. त्यामुळे विक्रेते प्रचंड नाराज आहेत. लोकं आता आमच्याकडे येत नाहीत. आले तरी निळा ड्रम घेत नाहीत, असं व्यापारी सांगतात. मेरठच्या घंटाघर परिसरात निळे ड्रम विकण्याची जेवढी दुकाने आहेत, सध्या त्या ठिकाणी स्मशान शांतता पसरली आहे.
दुकानदार रिकामेच बसलेले दिसत आहेत. एवढंच कशाला ग्राहकांना समजावण्याचा प्रयत्नही दुकानदार करत आहेत. ज्यांनी गुन्हा केला ते तुरुंगात आहेत. ड्रमचा काय दोष आहे? असा सवाल दुकानदार ग्राहकांना करत आहेत. काही दुकानदार तर ग्राहकांकडे जाऊन ड्रमची खासियतही सांगत आहेत. पाण्यासाठी ड्रम किती उपयोगी आहे याची माहिती देत आहेत. धान्य ठेवण्यासाठी त्याचा कसा वापर करता येऊ शकतो याचीही माहिती देत आहेत. मात्र, तरीही ग्राहक ऐकायला तयार नाहीत. आता आम्ही आयडी पाहूनच ड्रम विकणार आहोत, असं ड्रम विक्रेत्यांनी सांगितलं. सौरभ मर्डर केसचं सर्वात जास्त नुकसान ड्रम विक्रेत्यांना झालं असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.
सौरभ हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला. मुस्कान आणि साहिलने सौरवची हत्या केली. त्याचे डोकं धडापासून वेगळं करून त्याचे मनगट कापले आणि निळ्या ड्रममध्ये ठेवण्यात आले. डोकं वेगळं ठेवण्यात आले, धड वेगळं ठेवण्यात आले, चाकू वेगळा ठेवला होता आणि मनगटं वेगळी ठेवली होती. या हत्याकांडात निळ्या ड्रमचा उल्लेख होता. त्यामुळे त्यावरून सोशल मीडियावर आता जोक्सही व्हारल होत आहेत. “भाई, निळा ड्रम घरी न्या, किंवा फुकट घ्या,” असे जोक्स सोशल मीडियातून व्हायरल होत आहेत. त्वरित निळा ड्रम बायको आणते आणि पती त्यापासून दूर पळत जातो, असंही काही व्हिडीओतून दाखवण्यात आलं आहे. खरंतर, अशा घटना दुकानदारांसाठी किती मोठं संकट ठरू शकतात, याचंच हे उदाहरण आहे.