लखनऊ | 9 डिसेंबर 2023 : पती-पत्नीची भांडणं प्रत्येक घरात होतात. कधी एखादा वाद पटकन मिटतो, तर काहीवेळा भांडण संपून पुन्हा नीट बोलायला लागाला बराट वेळ लागतो. पण काही वेळा याच वादातून अशी एखादी भयानक गोष्ट घडते, ज्याचा कोणीही विचार देखील केला नसेल. उत्तर प्रदेशच्या कन्नौज जिल्ह्यातही असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ते ऐकून सर्वच जण हादरले. बेडवर गर्भवती महिलेचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर तिचा पती आरडाओरडा करत खोलीतून बाहेर आला आणि म्हणाला की, हो, मीच मारलं आहे. मी माझ्या पत्नीचा खून केला आहे. माझं डोकं फिरलंय. असंबद्ध बडबड करणाऱ्या त्या इसमाने रागाच्या भरात गर्भवती पत्नीची हत्या केली. मात्र या हृदयद्रावक हत्येनंतर संपूर्ण गावात खळबळ उडाली. कोणी इतकं क्रूर कसा असू शकतो, असाच प्रश्न सर्वजण एकमेकांना विचारत होते.
ही संपूर्ण हृदयद्रावक घटना छिब्रामाऊ कोतवाली परिसरातील बैजू रामपूर गावात घडली. बैजू रामपूर गावातील रहिवासी असलेल्या ऋषीचा विवाह कानपूरच्या शिवराजपूर भागात राहणाऱ्या सोनी नावाच्या मुलीशी अवघ्या 10 महिन्यांपूर्वी झाला होता. लग्नाच्या वेळी सगळं काही आलबेल होतं. पण नवरा मुलगा ऋषी हा स्वतःमध्येच मग्न असयचा, फारसा कोणाशी काही बोलायचाही नाही.
शुक्रवारी पत्नीला माहेरून आणलं
ऋषी हा व्यवसायाने फेरीवाला म्हणून काम करतो. ऋषीचे वडीलही फेरीवाले म्हणून काम करतात. शुक्रवारी ऋषी त्याच्या पत्नीला माहेरहून, शिवराजपूर येथील घरातून सासरी घेऊन आला. पण घरी आल्यावर अचानक काय झालं कोणालाच कळलं नाही. ऋषी आणि त्याची बायको आतल्या खोलीत होते, दार बंद होतं. अचानक खोलीतून जोरजोरात ओरड्याचा आवाजा आल्याने इतर सर्वांनी त्या दिशेने धाव घेतली.
पत्नीचा चेहरा व डोक्यावर केले वार
हैवान बनलेला ऋषी त्याच्या गरोदर पत्नीला काठ्यांनी बेदम मारहाण करत होता. असे वाटत होते की त्याच्या डोक्यावर संतापाचं भूत स्वार झालं आहे. तो कशामुळे एवढा रागावला हे कोणालाच माहीत नव्हतं. पण त्याने पत्नीच्या फक्त चेहऱ्यावर आणि डोक्यावर वार करून तिची हत्या केली.
सर्वांसमोर कबूल केला गुन्हा
आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक घराजवळ आले. तेव्हा पती ऋषी धावत खोलीतून बाहेर आला आणि आपले दोन्ही हात वर करून, मोठमोठ्याने ओरडू लागला. मीच पत्नीचा खून केलाय, माझं डोकं खराब झालयं असं सांगत त्याने सर्वांसमोर हत्येची कबूली दिली. त्याच्या वडिलांनी त्याचा कानाखाली मारून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, पण तो कोणाचच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.
पोलिसांनी मारेकरी पतीसह आई आणि वडिलांनाही केली अटक
या घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी पती ऋषी, त्याची आई आणि वडिलांना अटक केली. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. मृत महिलेच्या माहरेच्या लोकांनाही या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिस या प्रकरणी अधित तपास करत आहेत.