लखनौ : प्रेयसीला भेटायला आलेल्या प्रियकराला (Boyfriend) तिच्या वडिलांनी रंगेहाथ पकडलं. त्यानंतर तरुणाची गळा दाबून हत्या (Murder) केली. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh Crime News) लखीमपूर खिरी जिल्ह्यात सोमवारी रात्री हा धक्कादायक प्रकार घडला. हत्येनंतर बापाने प्रियकराचा मृतदेह गोणीत भरला. त्यानंतर घराच्या अंगणात बांधलेल्या सेप्टिक टँकमध्ये टाकला. पोलिसांनी अवघ्या काही तासातच या हत्या प्रकरणाचा छडा लावत आरोपीला अटक केली आहे.
अजमत अली यांचा 18 वर्षांचा मुलगा नसीम याचं दुसऱ्या गल्लीत राहणाऱ्या 17 वर्षीय परधर्मीय तरुणीसोबत प्रेम प्रकरण सुरु होतं. नसीम आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी रात्रीच्या वेळी तिच्या घरी पोहोचला. याची कुणकुण तिच्या बापाला लागली. नसीम आणि मुलीला त्याने रंगेहाथ पकडलं.
दोघांना पाहून बापाचा संताप अनावर झाला. त्याने मुलीला झापलंच, पण नसीमची गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर त्याने तरुणाचा मृतदेह गोणीत भरला आणि तो घराच्या अंगणात बांधलेल्या सेप्टिक टँकमध्ये टाकला.
दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास अजमत अली यांनी धौराहरा कोतवाली पोलिसांत आपला मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दिली. तसंच तो त्याच्या प्रेयसीला भेटायला तिच्या घरी गेल्याची शंका व्यक्त केली.
पोलिसांनी नसीमच्या प्रेयसीच्या घरी धाव घेतली. तिच्या वडिलांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. नसीमची गळा दाबून खून केल्यानंतर त्याचा मृतदेह गोणीत भरुन घराच्या अंगणात बांधलेल्या सेप्टिक टँकमध्ये टाकल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं.
त्यानुसार पोलिसांनी पंपाद्वारे सेप्टिक टँकमधील पाणी उपसलं आणि गोणीत भरलेला नसीमचा मृतदेह बाहेर काढला. तो पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. तर आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरु केला आहे.
संबंधित बातम्या :
अल्पवयीन गर्लफ्रेण्डसोबत लग्नाला विरोध, दत्तक मुलाकडून आईची हत्या
नागपुरातील महिला कंडक्टरच्या हत्येचं गूढ उकललं, दाम्पत्याला अटक
बहिणीचा नकार भावाच्या जीवावर, प्रियकराकडून सूड, प्रेयसीच्या चिमुकल्या भावाची हत्या