गोरखपूर : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याची घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे उघडकीस आली आहे. अखेर ‘त्या’ तरुणाच्या मृत्यूचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आले आहे. रामानंद विश्वकर्मा असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पत्नी, तिचा प्रियकर आणि त्याचा मित्र अशा तीन आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. पोलिसांना याप्रकरणात कोणतेच धागेदोरे मिळत नव्हते. मात्र एक डायरी पोलिसांच्या हाती लागली अन् सर्व प्रकरणाचा खुलासा झाला.
एका डायरीच्या सहाय्याने उत्तर प्रदेशच्या गोरखपूर पोलिसांनी या हत्येचे गूढ उकलले. पत्नीने प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या मदतीने 6 मार्च रोजी अनैतिक संबंधांसाठी कट रचून आपल्या पतीला दूर केले. गोरखपूरच्या गिडा भागातील मल्हीपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. रात्री पत्नीने नवऱ्याच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळून खाऊ घातल्या. यामुळे पती गाढ झोपला.
यानंतर रात्री एकच्या सुमारास प्रियकर त्याच्या मित्रासह महिलेच्या घरात आला. मग तिघांनी तरुणाची हत्या करुन मृतदेह पोखराजवळ तलावात फेकून दिला. दुसऱ्या दिवशी पोलिसांना तलावात मृतदेह आढळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांची चौकशी सुरु केली.
पोलिसांना घटनास्थळावरुन काहीही हाती लागले नाही. यामुळे पोलिसांनी रामानंदच्या खोलीची झडती घेतली. यावेळी पोलिसांच्या हाती रामानंदच्या पत्नीची डायरी मिळाली. या डायरीत रामानंदचे आणि पत्नीचे संबंध चांगले नसल्याचे लिहिले होते. तसेच डायरीत पोलिसांना महिलेचा प्रियकरासोबत फोटोही सापडला. यानंतर पोलिसांना पत्नीवर संशय बळावला.
पोलिसांनी रामानंदच्या पत्नीला ताब्यात घेत कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. आपल्या नणंदेचा दिर बृजमोहनशी आपले प्रेमसंबंध जुळले. दोघांना एकत्र रहायचे होते म्हणून त्या दोघांनी रामानंदला आपल्या मार्गातून दूर करण्याचा कट रचल्याचे पत्नीने पोलीस चौकशीत सांगितले. यात बृमोहनच्या मित्रानेही मदत केली.