कानपुर | 28 सप्टेंबर 2023 : भावा-भावांचं प्रेम खूप घट्ट असतं. आपला भाऊ हाच प्रत्येकाचा पहिला मित्र असतो. सुखात, दु:खात भाऊ पाठिशी खंबीरपणे उभा असेल तर त्याहून मोठा दिलासा नसतो. पण हाच भाऊ जीवावर उठला तर ? एका मुलानेच दुसऱ्या मुलाच्या जीवाचं काही बरवाईट केलं तर आई-बाबांनी कोणाकडे पहायचं ? अशी एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली, ज्यामुळे संपूर्ण गावातच खळबळ उडाली. मोठ्या भावानेच लहान भावाची गोळी मारून हत्या (murder) केल्याच्या बातमीने सगळेच हादरले.
उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये घडलेल्या या घटनेने अख्ख्या गावाला धक्का बसला. या हत्येबाबत अनेक प्रकारचे कयास लावले जात आहेत. अखेर आरोपीने हे टोकाचं पाऊल उचललं तरी का असाच प्रश्न सर्वजण विचारत आहेत. पोलिसांनी आरोपी आरजू याला अटक केली आहे. याप्रकरणी सध्या तपास सुरू असून आरोपीचीही चौकशी करण्यात येत आहे.
या कारणामुळे भाऊच भावाच्या जीवावर उठला
आरोपी आरजू हा घरातील मोठा मुलगा, तर त्याचा छोटा भाऊ अदनान हा नेहमी, सतत आजारीच असायच. घरातले लोक त्याच्या उपचारासाठी सतत झटायचे. त्याला बरं वाटावं यासाठी वडिलांनी देखील पाण्यासारखा पैसा खर्च केला. मात्र याच गोष्टीचा आरोपी आरजूला खूपच राग यायचा. ही संपूर्ण घटना कानपूरच्या जूही ठाणे क्षेत्रातील आहे.
मृत अदनानचा मोठा भाऊ, आरोपी आरजू याने सांगितले की, तब्येतीवर उपचार आणि शिक्षणाच्या नावाखाली लहान भावावर सतत लाखो रुपये खर्च केले जात होते. त्याची प्रकृती बरी व्हावी म्हणून कुटुंबियांनी मांत्रिकावरही लाखो रुपये उधळले. मात्र आरजूला हे मान्य नव्हते. तो नेहमी या गोष्टीला विरोध करायचा, पण कोणीची त्याचं ऐकायचं नाही. काही दिवसांपूर्वी त्याने काही कामासाठी घरच्यांकडे थोडे पैसे मागितले, तेव्हा त्याला थेट नकार मिळाला. त्याला काय म्हणायचंय हे देखील कुणीच ऐकायला तयार नव्हतं.
म्हणूनच छोट्या भावाचा काटा काढला
या सगळ्या गोष्टींमुळे आरोपी नाराज होता. त्याच्या मनात छोट्या भावाविषयी देखील नकारात्मक भावना होत्या. लाखो रुपये खर्च करूनही लहान भावाच्या तब्येतीत काहीच सुधारणा होत नव्हती तरी त्याचे कुटुंबिय ऐकत नव्हते. यामुळे आरजू संतापला आणि त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. त्याने त्याच्याच छोट्या भावाला गोळी मारून संपवले.
छोटा भाऊ घराच्या गच्चीवर झोपायला गेला होता. तेव्हाच आरोपी तेथे पोहोचला आणि भाऊ झोपलेला असतानाच त्याच्या डोक्यावर बंदूक ठेऊन चाप ओढला. भावाची हत्या करून तो गच्चीवरूनच खाली उतरला आणि फरार झाला. घडलेला प्रकार घरच्यांचा लक्षात येताच घरात एकच गदारोळ माजला. पोटच्या मुलाची हत्या झाल्याने कुटुंबिय शोकाकुल झाले.
हत्येच्या घटनेबद्दल कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि तपास करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. मोठा मुलगा घरात दिसत नसल्याने पोलिसांनी कसून चौकशी केली. मिळालेल्या माहितीवरून त्यानेच हा खून केल्याचा संशय पक्का झाला आणि पोलिसांनी शोध घेत अवघ्या 12 तासांच्या आतच आरोपी मुलाला अटक करत बेड्या ठोकल्या.