लखनऊ | 22 सप्टेंबर 2023 : पती-पत्नीचं भांडण होणं हे काही नवीन नाही. घर म्हटलं की भांड्याला भांडं (husband wife dispute) लागतंच. नवरा-बायकोचं भांडण झालं की काहीवेळ राग राहतो, पण नंतर मामला शांत होऊन सगळं आलबेल होतं. पण एखादवेळेस हे भांडण थांबल नाही, आणि त्या भांडणाचा राग दुसऱ्यावर काढून त्याला त्रास झाला तर ?अशीच एक घटना कानपूरमध्ये घडली आहे. तेथे एका इसमाने त्याच्या पत्नीशी वाद झाल्यावर त्या भांडणाचा राग काढण्यासाठी असं कृत्य केलं, ज्यामुळे सगळं एका क्षणात उद्ध्वस्त झालं.
उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये पत्नीशी झालेल्या वादानंतर पतीने राग काढत त्याच्या अवघ्या दीड वर्षांच्या मुलीला बेदम मारहाण करत तिची हत्या केली. आजूबाजूच्या लोकांना कळताच दहशत पसरली. पण त्यांनी हिंमत गोळा करून त्या मारेकरी बापाला एका झाडाला बांधून ठेवले. अखेर पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी राजीवला अटक केली.
ही घटना पश्चिम पारा परिसरातीलन तुलसीयापूर गावातील आहे, तेथे वडिलांच्या रागामुळे एका निष्पाप मुलीचा मृत्यू झाला. आरोपी राजीव राजपूत हा त्याची पत्नी नेहा आणि दोन मुलांसह गावात रहात होता. मात्र गुरुवारी रात्री राजीव आणि त्याच्या पत्नीचा कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. हा वाद वाढत गेला आणि त्याचे मोठ्या भांडणातच रुपांतप झाले. रागारागात नेहाने राजीवला धक्का दिला. मात्र यामुळे राजीव इतका संतापला की त्याने काठी उचलून त्याच्या अवघ्या दीड वर्षाच्या मुलीला बेदम मारहाण केली आणि नंतर गळा दाबून तिचा खून केला. यामुळे त्या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर आरोपी राजीव हा घराबाहेर येऊन बसला. ही बाब आजूबाजूच्या लोकांना कळताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस येताना दिसताच राजीव तेथून पळू लागला, पण गावकऱ्यांनी त्याला पकडले आणि झाडाला बांधले.
पोलिसांनी घटनास्थळ गाठून राजीवला अटक केली आणि मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. ‘आमचा वाद सुरू होता, तेव्हाच राजीवने माझ्या मुलीला काठीने बेदम मारहाण केली ‘ असा आरोप त्याच्या पत्नीने लावला आहे. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या निर्दयी पित्याला मुलीची हत्या केल्याचा जराही पश्चाताप नाही. मलाही मारहाण झाली ना , मग ( हत्येसाठी ) मी काय करू ? असा उन्मत्त सवालही त्याने केला. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.