अयोध्या | 7 ऑक्टोबर 2023 : एका कापड व्यावसायिकाकडून लाखो रुपयांची खंडणी मागितल्याची घटना समोर आली आहे. याच व्यापाऱ्याच्या मोठ्या भावाची काही वर्षांपूर्वी गोळ्या मारून हत्या करण्यात आली होती. खंडणीचे पैसे दिने नाही तर तुम्हालाही तुमच्या मोठ्या भावाकडे पाठवू, अशी धमकी खंडणीखोरांनी दिली आहे. सध्या या व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून अयोध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या खंडणी मागणाऱ्या आरोपींचे मोबाईल नंबर ट्रेस करण्यात येत आहेत.
एका फोनने माजला गदारोळ
हरजीत छाबडा असे फिर्यादी इसमाचे नाव आहे. 2 ऑक्टोबर रोजी, गांधी जयंतीच्या दिवशी संध्याकाळी पावणेआठच्या सुमारास त्यांना एक कॉल आला. अनोळखी नंबरवरून आलेल्या या कॉलमध्ये त्यांच्याकडे थेट 12 लाखांची खंडणी मागण्यात आली. आणि हे पैसे दिले नाही तर तुम्हाला तुमच्या (स्वर्गवासी) भावाकडे पाठवू, अशी धमकीही त्यांना देण्यात आली. या कॉलमुळे एकच खळबळ उडाली मात्र छाबडा यांनी न घाबरता लगेच पोलिसांना याची माहिती दिली आणि स्वत: एसएसपीची भेट घेऊन लेखी तक्रार दिली. त्यासोबतच त्यांनी खंडणीखोरांच्या फोन कॉलचे व्हॉईस रेकॉर्डिंगही सादर केले.
पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा तपास सुरू केला आहे. खंडणीखोरांचा मोबाईल नंबर ट्रेस करण्यात येत आहे. हा कॉल कुठून आला आणि कोणी केला, याचा तपास पोलिसांतर्फे केला जात आहे. तसेच या कॉलचा त्या व्यापाऱ्याच्या भावाच्या हत्येशी काही संबंध आहे का, त्याचाही पोलिस शोध घेत आहेत.
सहा वर्षांपूर्वी भावाचा घेतला होता जीव
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छाबडा यांच्या मोठ्या भावाची सहा वर्षांपूर्वी हत्या झाली होती. 17 ऑक्टोबर 2017 रोजी धनत्रयोदशीच्या दिवशी शहरातील मुख्य बाजार चौकात बलजीत छाबजा यांच्यावर गोळी झाडण्यात आली. अत्यंत गजबजलेल्या परिसरात असलेल्या त्याच्या दुकानात घुसून ही घटना घडली. यानंतर काही दिवसांनी बलजीत यांचा भाऊ हरजीत सिंग यांच्यावरही जीवघेणा हल्ला झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुख्य आरोपीसह आठ जणांना अटक केली. चार वर्ष चाललेल्या खटल्यानंतर सात जणांना जन्मठेप आणि १.१५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला . या घटनेला आता सहा वर्ष उलटून गेल्यावर हरजीत सिंग छाबडा यांना पुन्हा खंडणीचा आणि धमकीचा फोन आल्याने कुटुंबिय धास्तावले आहेत.