आझमगढ | 14 ऑक्टोबर 2023 : अवघ्या सहा महिन्यांपूर्वी त्या घरात सनई-चौघडे वाजले होते. धूमधडाक्यात त्यांनी लग्न (marriage) लावत मुलीला सासरी पाठवलं होतं. लग्नाला सहा महिनेही पूर्ण होतात न होतात, तोच आपल्या मुलीच्या बाबतीत असं काही होईल याची त्या आई-वडिलांना कल्पनाही नव्हती. तिची हालत पाहून शेजारी-पाजारीच नव्हे तर पोलिसही धास्तावाले. उत्तर प्रदेशच्या (uttar pradesh) आझमगढमधील हे प्रकरणं ऐकून सगळेच हादरले.
एका नवविवाहीतेची तिथे निर्घृणपणे हत्या करणयात आली. मिळालेल्या माहितीनुसार, हुंडा म्हणून दुचाकी न दिल्याने विवाहितेचा खून करण्यात आला. तिचा पती आणि सासरच्या मंडळींनी मिळूनची ही हत्या केली आणि त्यानंतर घरातच खड्डा खणून मृतदेह पुरला. धक्कादायक गोष्ट म्हणजे, याच वर्षी एप्रिलमध्ये त्या तरूणीचे लग्न झाले होते. महाराजगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अराजी जजमान जोत गावात ही घटना घडली. मृत तरूणी अनिता, हिचा भाऊ हरेंद्र याच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिचे सासरे गुलाब आणि पती सूरजविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
हत्येची ही घटना घडल्यापासून आरोपी फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांचे छापे सुरू आहेत. मृत तरूणीच्या भावाच्या सांगण्यानुसार, हुंडा म्हणून बाईक मागत, त्याच्या बहिणीचा अनेकदा छळ केला जात होता. गरीब आर्थिक परिस्थितीमुळे त्यांची मागणी पूर्ण होऊ शकली नाही. थोडं कर्ज घेतल्यानंतर स्वतःच्या खात्यातून 40 हजार रुपये जमा करून त्यांनी बहिणीच्या सासरच्या मंडळींना दिले, पण तरीही त्यांचे समाधान झाले नाही. तिचा पती अनेकदा बहिणीला मारहाण करायचा, असा आरोप त्याने लावला.
पोलिसांनी याप्रकरणी शेजार-पाजारच्यांची देखील चौकशी केली, त्यातून बरीच धक्कादायक माहिती उघड झाली. तिला मारहाण होत असताना हिंमत दाखवूनही आम्ही वाचवण्यासाठी जाऊ शकलो नाही, असे शेजाऱ्यांनी सांगितले. यापूर्वी तिच्यावर अत्याचार झाले, तेव्हा मध्यस्थीसाठी गेलो होतो. मात्र त्यांनी आमच्यावर छेडछाडीचे आरोप लावण्याची धमकी देत याप्रकरणापासून दूर राहण्यास सांगितले.